रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 08:34 PM2020-01-10T20:34:14+5:302020-01-10T20:43:24+5:30

देशभरात विविध गोष्टींवरुन वादाचे प्रमाण वाढत असताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हिंसा करणाऱ्यांचे कानच टोचले आहेत. हा आपल्या सर्वांचा देश आहे. येथे विध्वंसक मनोवृत्ती न ठेवता सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे.

Violence on the streets will not solve problems: Vice President Venkaiah Naidu | रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व राज्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेत हवे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात विविध गोष्टींवरुन वादाचे प्रमाण वाढत असताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हिंसा करणाऱ्यांचे कानच टोचले आहेत. हा आपल्या सर्वांचा देश आहे. येथे विध्वंसक मनोवृत्ती न ठेवता सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. रस्त्यांवर येऊन वाहने जाळल्याने, हिंसा केल्याने कुठल्याही समस्येचे समाधान होऊ शकत नाही. जाळायचेच असतील तर नकारात्मक विचार जाळा. प्रगतीसाठी देश व समाजात शांती आवश्यकच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.


कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे अध्यक्ष गौतम पटेल, सचिव सरोजा भाटे, स्थानिक सचिव मधुसूदन पेन्ना प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात १९ हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. भाषा या संस्कृती व परंपरेच्या वाहक आहेत. भाषा व भावना एकसोबच चालतात. भूतकाळ व भविष्याला जोडणाºया त्या धागा असतात. त्यामुळे संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मातृभाषेवर भर दिला पाहिजे. खासगी जीवन असो किंवा सार्वजनिक व्यवहार मातृभाषेचाच उपयोग झाला पाहिजे. विशेषत: मुलांचे प्राथमिक शिक्षण तर मातृभाषेतच झाले पाहिजे. यासाठी देशातील सर्व राज्य शासनांनी पुढाकार घ्यायला हवा. इंग्रजी-हिंदीतून शिक्षण चौथीनंतरदेखील घेता येईल. मातृभाषा ही डोळे तर दुसरी भाषा चष्म्याप्रमाणे असते. जर डोळेच समृद्ध नसतील तर चष्म्याचा उपयोग काय असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी प्रास्ताविक केले. या परिषदेप्रसंगी १११ संस्कृत विषयक ग्रंथाचे प्रकाशन डिजिटल माध्यमाद्वारे करण्यात आले. डॉ.मधुसूदन पेन्ना यांनी आभार मानले.

शिक्षणप्रणालीत बदल व्हावा
यावेळी व्यंकय्या नायडू यांनी शिक्षणप्रणालीतील बदलावरदेखील भाष्य केले. आपल्याकडे ब्रिटिशांनी आणलेली शिक्षणप्रणाली आहे. यातून आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊ लागले व मूल्यांचा ऱ्हास सुरू झाला आहे. शारीरिक शिक्षण, निसर्गाचे धडे विद्यार्थ्यांना मिळतच नाहीत.त्यामुळेच शिक्षणप्रणालीत बदल होणे आवश्यक आहे. देशाचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांना शिकवायलाच हवा. जर संस्कृती विसरले तर देश प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंनीदेखील शिक्षणप्रणालीत आवश्यक बदलांसाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

तर चंद्रनमस्कार घाला
आपल्या संस्कृतीतील मूल्यांचे पालन जग करू लागले आहे. संस्कृत भाषेत संशोधन जर्मनीमध्ये जास्त प्रमाणात सुरू आहे. योगासने तर संयुक्त राष्ट्रानेदेखील मान्य केली आहेत. आपली संस्कृती ही धर्मापेक्षा वेगळी आहे. धर्म ही खासगी बाब आहे, परंतु संस्कृती ही जीवनपद्धती आहे. त्यामुळे संस्कृतीचा प्रचार-प्रसार झालाच पाहिजे. एकदा एक विद्यार्थी माझ्याजवळ आला व मी सूर्यनमस्कार कसे घालू असा प्रश्न केला. मला त्याचा रोख कळला व त्याला म्हटले की चंद्रनमस्कार कर. योगासने ही आपल्या संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. त्याला धर्माच्या चौकटीत बांधणे योग्य नाही, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

संस्कृत, वेद एका जातीपुरते मर्यादित नाहीत
भाषेला एखाद्या जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून बघू नये. संस्कृत भाषा किंवा वेद, उपनिषदे हे साहित्य प्रकार कोणत्या एका समुदायापुरते मर्यादित नसून ते सर्वांना उपलब्ध आहेत. कुणीही त्यांचा अभ्यास करू शकतो. संस्कृत भाषेतील शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करून संस्कृतचा प्रचार हा साध्या सोप्या भाषेत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.

पर्शियनचा उदय संस्कृतमधून : गडकरी
रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उभारणीमध्ये माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जिचकार यांचे मौलिक योगदान होते. पर्शियनसारख्या भाषेचा उदय हा संस्कृतमधून झालेला आहे. तेहरान विद्यापीठामध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन केंद्र आहे. जर्मनीमध्ये आयुर्वेद शास्त्राचे अध्ययन होत आहे. त्यामुळे भारतातदेखील संस्कृत भाषेत सखोल संशोधन व अध्ययन गरजेचे आहे असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

आयोजनात ढिसाळपणा
संमेलनाच्या उद्घाटनाला उपराष्ट्रपती व केंद्रीय मंत्री येणार असल्याने सभागृहात उपस्थितांच्या आसनव्यवस्थेचे अगोदरच नियोजन करणे आवश्यक होते. परंतु त्यात ढिसाळपणा दिसून आला. कुणीही कुठेही बसत असल्याचे चित्र होते. प्रसारमाध्यमांसाठी आरक्षित असलेल्या जागेत इतरच लोक बसले असल्याने प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मनस्ताप झाला. शिवाय मान्यवर व व्हीआयपींच्या जागेवरदेखील असेच चित्र होते. विशेष म्हणजे वेळेवर व्यवस्था सांभाळण्यासाठी विद्यापीठातर्फे कुणीच उपस्थित नव्हते.

उपराष्ट्रपतींच्या विनयाने नागपूरकरांना जिंकले
या कार्यक्रमाला ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य, राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांच्यासह विविध ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. मंचावरुनच उपराष्ट्रपतींना ते लक्षात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वत: मंचावरुन खाली उतरले व त्यांनी मा.गो.वैद्य व प्रमिलताई मेढे यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्या समवेत नितीन गडकरी हेदेखील होते. उपराष्ट्रपतींच्या या विनयाने उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: Violence on the streets will not solve problems: Vice President Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.