विदर्भातील उद्योजकांनी सौरऊर्जेवर भर द्यावा  : ऊर्जामंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:33 PM2020-01-27T23:33:34+5:302020-01-27T23:35:36+5:30

उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करून वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केले.

Vidarbha entrepreneurs should focus on solar: Energy Minister Nitin Raut | विदर्भातील उद्योजकांनी सौरऊर्जेवर भर द्यावा  : ऊर्जामंत्री नितीन राऊत

विदर्भातील उद्योजकांनी सौरऊर्जेवर भर द्यावा  : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Next
ठळक मुद्देव्हीआयएच्या बैठकीत उद्योगाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन तत्पर असून, उद्योगांना लागणारी वीज अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासोबतच उद्योजकांनी सौरऊर्जेची अधिकाधिक निर्मिती करून वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने उद्योगभवन येथे आयोजित केलेल्या उद्योजकांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, प्रशांत मोहता, सुरेश अग्रवाल, राजेंद्र गोयंका, गौरव सारडा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदर्भातील उद्योगांना पोषक वातावरण असूनही उद्योगांना हवी तशी गती मिळत नाही. हिंगणा, बुटीबोरी, मिहान औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचा विकास करताना उद्योजकांनी येत असलेल्या अडचणींबाबत प्रस्ताव सादर करावेत. नागपूर तसेच विदर्भात वीजनिर्मिती होत असल्याने येथील उद्योगांना कमी दरात वीज पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. शासन विजेचे दर लगेच वाढविणार नाही. पण उद्योगांनीही नियमित वीज बिल भरत हरित ऊर्जा आणि सौरऊर्जेकडे वळणे काळाची गरज बनली आहे, असे राऊत म्हणाले.
विदर्भात मोठे उद्योग आणताना त्यासाठी ग्रोथ इंजिन ठरू शकणाऱ्या घटकांना चालना देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल. केवळ उद्योगच नाही तर येथे खाण प्रकल्प, पर्यटनवाढीवर भर देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात मोठा कारखाना उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे अ‍ॅडव्हान्टेज विदर्भासारखा ‘इनक्रेडिबल विदर्भ’उपक्रम विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात उद्योग सुरू करताना लागणारी परवानगीची कागदपत्रे विदर्भातच मिळतील याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उद्योजकांना दिले.

Web Title: Vidarbha entrepreneurs should focus on solar: Energy Minister Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.