वंचित बहुजन आघाडी ‘अपयशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 09:09 PM2019-05-24T21:09:08+5:302019-05-24T21:10:51+5:30

गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखावर मते घेत तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले असले तरी नागपुरात मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. नागपूरचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६ हजार मते घेतली मात्र आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात ही मते पुरेशी नाहीत, असेच म्हणावी लागेल.

Vanchit Bahujan Aghadi 'Unsuccess' | वंचित बहुजन आघाडी ‘अपयशी’

वंचित बहुजन आघाडी ‘अपयशी’

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्याकडे मतदारांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखावर मते घेत तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले असले तरी नागपुरात मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. नागपूरचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६ हजार मते घेतली मात्र आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात ही मते पुरेशी नाहीत, असेच म्हणावी लागेल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांना संपूर्ण राज्यात मिळालेला प्रतिसाद बघता वंचित आघाडी ही राज्यात तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. झालेही तसेच. औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार निवडून आला. आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला असला तरी, वंचितच्या उमेदवारांनी भरभरून मते घेतली. अनेक उमेदवारांनी लाखांवर मते घेतली. त्यामुळे राज्यात वंचित बहुजन आघाडीने आपला एक दबदबा निर्माण केला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु नागपुरात मात्र आघाडीला पाहिजे तसे यश मिळवता आले नाही. आंबेडकरी चळवळीचे गड समजल्या जाणाऱ्या नागपुरात वंचित बहुजन आघाडीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. सोबत एमआयएम असल्याने मुस्लीम समाजाचेही पाठबळ मोठ्या प्रमाणावर मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे नागपुरात वंचितचा उमेदवार किती मते घेणार? याकडे लोकांचे लक्ष होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांनी २६,१२८ मते घेतली. ही मते बऱ्यापैकी आहेत, असे काही जण मानतात. परंतु मागील काही वर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील विद्यार्थी व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जुळला. आंबेडकरी चळवळीचा गड असलेल्या नागपूर शहरातील तरुणांचाही यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
नागपुरात इंदोरा मैदान येथे त्यांच्या सभेला मिळलेला प्रतिसाद पाहता वंचित बहुजन आघाडी नागपुरात बऱ्यापैकी मते घेईल असे म्हटले जात होते. परंतु तसे झाले नाही. तगड्या उमेदवाराच्या शोधासाठी उमेदवार जाहीर होण्यास झालेला विलंब हे सुद्धा त्याचे एक कारण मानले जाते. एकूणच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली परंतु अपेक्षित यश मिळू शकले नाही.

नागपूरपेक्षा रामटेकमध्ये चांगली मते
नागपूरच्या तुलनेत रामटेकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार किरण पाटणकर यांनी ३६ ,३४० मते घेऊन वंचितची ताकद दाखवली खरी. परंतु याच किरणताई जेव्हा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. तेव्हा त्यांनी ९५ हजारावर मते घेतली होती. त्या तुलनेत ती कमी असली तरी पाटणकर यांची सामाजिक बंधिलकी आणि नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीेची ही ताकद म्हणावी लागेल.

विधानसभेत ठरणार निर्णायक
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी राज्यात ४० लाखावर मते घेतली आहेत. अनेक उमेदवारांनी लाखावर मते घेतली. अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाांवर राहिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चिंता निश्चितच वाढली आहे. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही महत्त्वाची राहील, नव्हे तर निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: Vanchit Bahujan Aghadi 'Unsuccess'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.