सामाजिक उपक्रमांचा 'व्हॅलेंटाईन डे': बहरला प्रेमाचा वसंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:20 PM2020-02-14T22:20:41+5:302020-02-14T22:22:58+5:30

‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला.

Valentine's Day for Social Activities: Spring to Love Bloom! | सामाजिक उपक्रमांचा 'व्हॅलेंटाईन डे': बहरला प्रेमाचा वसंत!

सामाजिक उपक्रमांचा 'व्हॅलेंटाईन डे': बहरला प्रेमाचा वसंत!

Next
ठळक मुद्देशहरात कडक पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला की जिवलगाला भेटण्याची ओढ ही आलीच. घरातून उपस्थित होणारे प्रश्न, लोकांच्या भिरभिरत्या नजरा चुकवत ‘कुछ भी हो’ पण एका क्षणासाठी भेटण्याची धडपड. सोबतीला जागोजागी असलेला बंदोबस्त अन् प्रेमदिवसाला विरोध करणाऱ्या संघटनांचा विरोध. या सर्व वातावरणात ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला.


प्रेमाच्या बाबतीत ‘हुश्शार’ झालेल्या ‘यंगिस्तान’ने शुक्रवारी भेटण्याचे कट्टेच बदलवले. कोणी शॉपिंग मॉलकडे मोर्चा वळविला तर कोणी आवडत्या ‘रेस्टॉरेन्ट’कडे धाव घेतली. अनेकांनी नाहक मनस्ताप टाळण्यासाठी मोबाईल, फेसबुक व ‘स्काईप’चा आधार घेतला. अनेक जण तर अशा प्रकारे भेटले की इतरांना ते अनोळखीच वाटावे, पण नजरांतूनच प्रेमाची देवाणघेवाण झाली. केवळ प्रेमीयुगुलच नव्हे तर तरुणांच्या ग्रुप्सनेदेखील धमाल केली. कोणी एखाद्या ‘पार्क’जवळ बसून निवांत चर्चा केली, तर कुणी बजाजनगरजवळ आपला कट्टा उभारला.

यंदा गालबोट नाही
जुने अनुभव लक्षात घेता शहरातील उद्याने ओस पडली होती. बजरंग दलाने रॅली काढली. कशाला हवी नसती भानगड असा विचार करून तरुणाईने सार्वजनिक स्थळांवर जाऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा बेत रद्द केला. सायंकाळच्या सुमारास शहरातील तरुणाईच्या कट्ट्यांवर गर्दी व्हायला सुरुवात झाली.

फुटाळ्यावर तरुणांचे रक्तदान
फुटाळा तलावावर फक्त तरुणाईची सामाजिक संवेदना पहायला मिळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात अनेक तरुण-तरुणींनी पुढाकार घेत रक्तदान केले. सकाळपासून सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते व तरुणांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांनीदेखील रक्तदानासोबत विविध सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती केली. पथनाट्येदेखील सादर केली.

बदललेले कट्टे
दररोज रस्त्याच्या दुतर्फा आपले वाहन उभे करून गप्पा मारणाऱ्या तरुणाईने आज आपले कट्टे बदलवले होते. एरवी सेमिनरी हिल्स, लेडीज क्लब, अमरावती मार्ग या परिसरातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे प्रेमीयुगुल व तरुणांचे ग्रुप सिव्हिल लाईन्स, लक्ष्मीनगर, महाराजबाग, वर्धा रोड, आरपीटीएस, आयटी पार्क, शिवाजीनगर येथील शांत रस्त्यावर दिसून येत होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला जाळण्याची घटना तसेच गुरुवारीच सावनेरमध्ये एका डॉक्टरवर अ‍ॅसिड फेकण्याची घटना ताजीच होती. ‘व्हॅलेंटाईन डे’ दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, अशाप्रकारे कुठलीही घटना होऊ नये याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. फुटाळा, महाराज बाग, ट्रॅफिक पार्क, सेमिनरी हिल्स या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Valentine's Day for Social Activities: Spring to Love Bloom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.