आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्यापासून लसीकरण; प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:02 AM2021-01-15T11:02:25+5:302021-01-15T11:02:54+5:30

Nagpur News Vaccination कोरोना विषाणू प्रतिबंधक लस मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी नागपूर विभागात ९३ हजार ३०९ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे.

Vaccination of health workers from tomorrow; Administration and health system ready | आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्यापासून लसीकरण; प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज

आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्यापासून लसीकरण; प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्देविभागातील ३४ केंद्र, ९३,३०९ आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल लस

 

लाोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणू प्रतिबंधक लस मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी नागपूर विभागात ९३ हजार ३०९ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. यात कोविड सेंटरसह शासकीय व खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना ही लस देण्यात येणार असून यासाठी सिरम इन्स्टिट्यूट येथून १ लाख १४ हजार कोविशिल्डचे डोसेस प्राप्त झाले आहेत. विभागातील ३४ केंद्रांवरुन कोविशिल्डची लस देण्यात येणार असून याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी गुरुवारी दिली.

कोरोनावरील लसीकरणासाठी कोविशिल्ड ही लस बुधवारी रात्री २.४५ वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचली. ३.४५ वाजताच्या सुमारास ती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी विशेष शितगृह असलेल्या वाहनाने रवाना करण्यात आली आहे. ही लस प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली आहे. विभागात ३४ केंद्रांद्वारे १६ जानेवारीपासून नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटतर्फे नागपूर विभागासाठी कोविशिल्ड लसीचे १ लाख १४ हजार डोस प्राप्त झाले असून त्यानुसार जिल्हानिहाय वितरित करण्यात आले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी ९ हजार ५००, चंद्रपूर २० हजार, गडचिरोली १२ हजार, गोंदिया १० हजार, नागपूर ४२ हजार तर वर्धा जिल्ह्यासाठी २० हजार ५०० कोविशिल्ड डोसेसचा समावेश आहे.

जिल्हानिहाय लसीकरण केंद्र

लसीकरणासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज असून प्रत्यक्ष लसीकरणासाठी विभागात ३४ केंद्रांद्वारे प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यात १२ केंद्र राहणार आहेत. यामध्ये नागपूर महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे. शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा महिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक, कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरीचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर उपजिल्हा रुग्णालय वरोरा व राजुरा, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी, नागरी रुग्णालय रामनगर तसेच पठाणपुरा

गोंदिया जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय देवरी

वर्धा जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू यांचा समावेश आहे.

भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखनी यांचा समावेश आहे.

९३ हजार ३०९ आरोग्य सेवकांची नोंदणी

कोरोना काळात प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांची नोंदणी करण्यात आली असून, विभागात ९३ हजार ३०९ आरोग्यसेवकांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्डचा पहिला डोस प्राधान्याने देण्यात येत आहे.

नोंदणी झालेल्या जिल्हानिहाय आरोग्य सेवकांमध्ये नागपूर शहरातील २५ हजार १६४ तर नागपूर ग्रामीण भागातील ९ हजार १६९ अशा ३४ हजार ३३३ जणांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील १६ हजार ७५४, भंडारा ७ हजार ६०२, चंद्रपूर १६ हजार ११०, गडचिरोली ९ हजार ९४७ तर गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार ५६३ आरोग्यसेवकांची नोंदणी झाली आहे.

‌‘वॅक्सिन’ घेतल्यावरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी

प्रत्येक रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही ‌‘वॅक्सिन’ देण्यात येणार आहे. परंतु ‌‘वॅक्सिन’ घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ‌‘वॅक्सिन’ लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अँटीबॉडी तयार होत नाही. त्यामुळे ‌‘वॅक्सिन’ लावल्यानंतरही आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात धुणे हे कटाक्षाने सुरु ठेवावे.

डॉ. संजय जायस्वाल

आरोग्य उपसंचालक, नागपूर विभाग

एका केंद्रावर १०० जणांना लसीकरण

आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिमेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष लसीकरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन आयोजित करुन लसीकरणाची पूर्वतयारी झाली आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज सरासरी शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Vaccination of health workers from tomorrow; Administration and health system ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.