नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:07 PM2019-08-20T22:07:29+5:302019-08-20T22:08:33+5:30

महामेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर एक टिफिनबॉक्स बेवारस अवस्थेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आढळून आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली.

Unclaimed Tiffinbox at Nagpur Metro Station! | नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स! 

नागपूरच्या  मेट्रो स्टेशनवर बेवारस टिफिनबॉक्स! 

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ : महामेट्रोतर्फे मॉक ड्रील

लोकमत  न्यूज  नेटवर्क        
नागपूर : महामेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर एक टिफिनबॉक्स बेवारस अवस्थेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आढळून आल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती स्टेशन नियंत्रकांनी बॉम्बशोधक नाशक पथकाला दिली. सूचना मिळताच अ‍ॅम्ब्युलन्स आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाहणी व पडताळणी केल्यानंतर डब्यात कुठलेही ज्वलनशील पदार्थ नसल्याचे घोषित केले. महामेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रीलचे आयोजन केल्याची माहिती प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास स्टेशनवर साफसफाई करणाऱ्या पंकज नामक कर्मचाऱ्याचे लक्ष एस्केलेटरजवळ असलेल्या टिफिन बॉक्सवर गेले. त्याला हे प्रकरण संशयास्पद वाटले. कुणीतरी टिफिन बॉक्स विसरलेला नसून जाणीवपूर्वक ठेवल्याचा त्याने अंदाज लावला. रिच-१ ची मेट्रो वाहतूक प्रवाशांसाठी खुली झाली असल्याने एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. दर तासाने मेट्रोची ये-जा असल्याने कुठल्याहीवेळी मेट्रोचे आगमन होऊन प्रवासी स्टेशनवर उतरतील व गर्दी वाढेल, असा अंदाज पंकजने लावला. आपत्कालीन स्थितीचा अंदाजा घेत वेळ वाया न घालवता त्याने याची माहिती स्टेशन कंट्रोलर शशांक पाटीलला दिली. पाटील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जागेवर पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी त्वरित बॉम्बशोधक नाशक पथकाला (बीबीडीएस) सूचना दिली. अंदाजे ३० मिनिटात पथक स्थानकावर दाखल झाले. या पथकाने लगेचच सावधगिरी बाळगत हालचाली सुरू केल्या. याआधी स्टेशन परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला होता. सूचना मिळताच पोलीस पथक आणि अ‍ॅम्ब्युलन्सदेखील घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाहणी व पडताळणी केल्यानंतर डब्यात कुठलेही ज्वलनशील पदार्थ नसल्याचे घोषित केले. पथकाने सामग्री तपासणीसाठी ताब्यात घेतली.
स्थानकावरील कर्मचाऱ्यांना नियमितपणे सुरक्षेसंदर्भात नियमित प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय आपत्कालीन स्थितीत इतरांच्या बचावासाठी करायच्या हालचाली आणि स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण तसेच सुरक्षा नियम, सावधगिरीसाठी मूलभूत माहितीही देण्यात येते. अशा पद्धतीने मेट्रो स्थानकांची सुरक्षा आणि दक्षतेचे परीक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. महामेट्रोने आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त मॉक ड्रीलचे आयोजन केले आहे, हे विशेष.

Web Title: Unclaimed Tiffinbox at Nagpur Metro Station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.