UIDAI launches first Aadhaar center in the state | युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार केंद्र सुरू

युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार केंद्र सुरू

ठळक मुद्देऑनलाईन अपॉयमेंटचीही सुविधा : इतर जिल्ह्यांमध्येही होणार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधार कार्ड काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आपापल्या स्तरावर आधार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. परंतु आता स्वत: युआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) आपले स्वत:चे आधार सेवा केंद्र सुरु करणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आधारचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी उपस्थित होते.
'यूआयडीएआय'द्वारे सुरु करण्यात आलेले आधार सेवा केंद्र हे मानकापूर परिसरातील सादिकाबाद येथे असलेल्या पासपोर्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरातच आहे. दररोज ५०० वर आधार एन्रोलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्राची क्षमता आहे. या आधार सेवा केंद्रावर जाण्यासाठी नागरिक ऑनलाईन अपॉईंटमेंटही घेऊ शकतात. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एन्रोल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) बदलून घेऊ शकता. हे आधारकेंद्र आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सुरू राहणार आहे. केंद्रावर दिवसाला ५०० वर आधार नोंदणी केल्या जाऊ शकणार आहे. याशिवाय ज्यांचे जुने आधारकार्ड गहाळ झाले असेल. त्यांना युआयडीच्या संकेतस्थळावर ‘ऑर्डर प्रिंट’ या लिंकवर जाऊन आपल्या आधारकार्डची माहिती भरावी लागणार आहे. सोबतच नवीन आधारकार्डसाठी नाममात्र फी देखील भरावी लागेल. यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात संबंधितांना पोस्टाच्या माध्यमातून त्यांचे आधारकार्डची नवी प्रिंट पाठविण्यात येईल, असे आधारचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी यांनी सांगितले.

अशी घ्या अपॉईंटमेंट?
पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील नागपुरात हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या आधार केंद्रावर सध्या ८ काऊंटर सुरू करण्यात आले असून, लवकरच त्याची संख्या १६ होणार आहे. या आधार नोंदणी केंद्रावर नागरिक स्वत: ‘अपॉयमेंट्स. युआयडीएआय.जीओव्ही.इन’ या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ’अपॉयमेंट’ घेऊ शकतात. त्यांना १ टोकन नंबर मिळाल्यानंतर त्यांनी तो टोकन नंबर घेऊन त्या केंद्रावर जाऊन आपले आधारशी संलग्नित काम करावयाचे आहे. तसेच केंद्रावर जाऊनही अपॉयमेंट घेतल्या जाऊ शकते.

९९.७८ टक्के नागरिकांचे आधारकार्ड तयार
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. तर २०१५ नुसार ४९,२२,०८१ एवढी आहे. यापैकी ४९,१०,७८२ नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. म्हणजेच जवळपास ९९.७८ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील ४८ आपले सरकार सेवा केंद्रावर, ४४ बँकांमध्ये, ७८ पोस्ट ऑफिसमध्ये व ३ बीएसएनएल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: UIDAI launches first Aadhaar center in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.