टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत : नागपूर आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:05 AM2019-06-22T00:05:00+5:302019-06-22T00:05:04+5:30

शहरात अनधिकृत सुरू असलेल्या ओलाच्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने पुन्हा बुधवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. चार दुचाकी जप्तही केल्या. मात्र, ‘अ‍ॅप’वर ही सेवा सुरूच असल्याने आरटीओकडून कंपनीवर काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.

Two wheeler taxis unauthorized: Nagpur RTO action | टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत : नागपूर आरटीओची कारवाई

टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत : नागपूर आरटीओची कारवाई

Next
ठळक मुद्देचार दुचाकी जप्त : कंपनीचे ‘अ‍ॅप’ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात अनधिकृत सुरू असलेल्या ओलाच्या ‘वेबबेस्ड टू व्हीलरटॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने पुन्हा बुधवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. चार दुचाकी जप्तही केल्या. मात्र, ‘अ‍ॅप’वर ही सेवा सुरूच असल्याने आरटीओकडून कंपनीवर काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.
परिवहन विभागाने राज्यात कुठेही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हीलरटॅक्सीज’ वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही. मात्र, शहरात ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली आहे. पूर्वी या ‘टॅक्सीज’ नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक, बर्डी व बसस्थानकावर सुरू होती. काही दिवसात या व्यवसायाने गती पकडली. या विरोधात विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर शिष्टमंडळासह शहर आरटीओ कार्यालयात धडकले. प्रवासी वाहतूक करताना परमिटची गरज असताना व ‘टू व्हीलर टॅक्सीज’ बाबत परिवहन विभागाने राज्यात कुणालाही परवानगी दिली नसताना शहरात ही प्रणाली का सुरू आहे, असा प्रश्न केला. दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. याला गंभीरतेने घेत आरटीओ शहर कार्यालयाने वायुपथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ‘रॅपिडो अ‍ॅप’च्या ‘एमएच३१ बीझेड ४१६२, एमएच३१ डीएच ४३६५, जेके १० यु ३४५०, एमएच ४९ वाय २०६८ व एमएच ३१ बीक्यू ३०८९ या दुचाकींवर अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची कारवाई करीत वाहने जप्त केली. नंतर ‘अ‍ॅप’ बंद पडले. परंतु आता ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली. याची दखल घेत १९ जून रोजी आरटीओच्या वायुपथकाने ‘एमएच ३१ एफके ४७०२’, ‘एमएच ३१ एसी ३४७३’, ‘एमएच ४९ एबी ६६७५’ व ‘एमएच ३१ डीए ५८७५’ ही वाहने जप्त केली.
शहरात सुमारे ५० वर दुचाकी ‘वेबबेस्ड टू व्हिलर टॅक्सीज’ म्हणून धावत आहेत. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी या दुचाकीचा फायदा होत असल्याने थोड्याच दिवसात मागणीत वाढ झाली आहे. बुधवारी कारवाई झाली तरी ओला कंपनीच्या अ‍ॅपवर ‘टू व्हिलर टॅक्सीज’ धडाक्यात सुरू आहे. वायुपथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी या ‘अ‍ॅप’वरून दुचाकी बुक करून जप्तीची कारवाई केल्याचे समजते.
वाहन नोंदणी रद्द करणार
कोणत्याही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हिलर टॅक्सीज’वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुठेच परवानगी देण्यात आलेली नाही. या विषयी तक्रार येताच चार ‘टू व्हिलर टॅक्सीज’ जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी या वाहनांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. संबंधित कंपनीवर कारवाईसाठी वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.
अतुल आदे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ (शहर)

Web Title: Two wheeler taxis unauthorized: Nagpur RTO action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.