नागपुरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:36 PM2020-09-16T22:36:53+5:302020-09-16T22:38:23+5:30

झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनची मागणी होत असली तरी हा कोरोनावरील उपाय नाही. प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केले आहे.

Two-day public curfew in Nagpur: Mayor's appeal | नागपुरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू : महापौरांचे आवाहन

नागपुरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू : महापौरांचे आवाहन

Next
ठळक मुद्दे३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवार व रविवार कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनची मागणी होत असली तरी हा कोरोनावरील उपाय नाही. प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केले आहे.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात बुधवारी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली. यावेळी आ. नागो गाणार, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने आदी उपस्थित होते.
शहरात जनता कर्फ्यू लागू करावा अशी बहुतांश उपस्थित लोकप्रतिनिधींनी मागणी केली. त्यानुसार महापौरांनी घोषणा केली. प्रारंभी शहरातील रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, कोविड केअर सेंटरची स्थिती, रुग्णवाहिका, शववाहिकांची संख्या आदींचा आढावा घेतला.

नागरिकांनी काटेकोर पालन करावे
बैठकीत शहरात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली. मात्र लॉकडाऊनचा निर्णय राज्यशासनाचा असल्याने आयुक्तांनी याला नकार दिला. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मनपाद्वारे त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वैद्यकीय सुविधांमध्येही भर पडली आहे, मात्र कोविड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. त्यानुसार महापौरांनी उद्या शुक्रवारी रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन केले. यानंतर पुढील शनिवारी आणि रविवारी म्हणजे २६ आणि २८ सप्टेंबरला सुद्धा जनता कर्फ्यू राहील. त्यानंतर पुन्हा सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले.

दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन
जनता कर्फ्यूच्या काळात औषध दुकानाव्यतिरिक्त कोणतीही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. तसेच शहरातील व्यापाऱ्यानीसुध्दा स्वयंस्फूर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेवून या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

लॉकडाऊनची नव्हे तर जबाबदारीची गरज
आज शहराची स्थिती पाहता लॉकडाऊनची नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जास्त गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आज शहरात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज असून त्या वाढीसाठी दररोजच मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची गरज नसल्याचे मत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.

Web Title: Two-day public curfew in Nagpur: Mayor's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.