Two contractor for collecting garbage in Nagpur | नागपुरात कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार
नागपुरात कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार

ठळक मुद्देनिविदा काढल्या : पावसाळा संपताच कार्यादेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात लवकरच नवीन पॅटर्ननुसार कचरा संकलन केले जाणार आहे. यासाठी शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. त्यांच्यावर घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी राहील. प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच भांडेवाडी येथील डम्पिंगयार्ड मधील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली जात आहे. यामुळे भविष्यात डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठणार नाही.
शहराचे असे असेल विभाजन
कचरा संकलनासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ता वाडी(अमरावती रोड)-व्हेरायटी चौक-झिरो माईल, एलआयसी चौक-सेंट्रल एव्हेन्यू रोड ते पारडी याप्रमाणे मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू गृहित धरून उत्तर भागात पाच झोन गृहित धरून सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.३५ लाख लोकसंख्या व दक्षिण भागात पाच झोन गृहित धरून १३.६३ लाख लोकसंख्या याप्रमाणे विभाजन करण्यात येणार आहे. यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
आर्थिक बोजा वाढणार
नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन व भांडेवाडी येथे वाहून नेण्यासाठी प्रतिटन १४०० रुपये खर्च येतो. यासाठी महापालिकेला वर्षाला ६० ते ७० कोटी खर्च करावे लागतात. परंतु वाढती महागाई, डिझेलचे दर व मजुरीत होणारी वाढ विचारात घेता नवीन निविदानुसार प्रतिटन २१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. दहा वर्षासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला दरवर्षी वाढीव दर द्यावे लागतील. यामुळे महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.
कंपोस्ट खत निर्माण करण्यावर भर
शहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे अपेक्षित आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आवाहन क रण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळातही ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. १२ शाळांत हा प्रकल्प सुरू झाला आहे. सर्वच शाळात प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.
उद्यानात खत प्रकल्प
महापालिकेची लहान-मोठी १३४ उद्याने आहेत. मॉईलच्या सहकार्याने उद्यानात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे उद्याने स्वच्छ राहतील. आजूबाजूच्या नागरिकांनाही ओला कचरा येथे टाकता येईल. यातून निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खतापासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. अशी प्रशासनाला आशा आहे.

 

 


Web Title: Two contractor for collecting garbage in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.