तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:17 PM2020-01-21T23:17:48+5:302020-01-21T23:19:29+5:30

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe new commissioner of Nagpur NMC | तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून मुंढे महापालिका आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा होती.
तुकाराम मुंढे हे या आधी एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. मुंढे यांची महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.
बारा वर्षांच्या नोकरीत नऊ वेळा बदलली झाली आहे. बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यात ताडसौन्ना या गावी गरीब शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. लहानपणी ते वडिलांसोबत आठवडी बाजारात भाजी विकण्यास जात. जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर अकरावी, बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. २००१ मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २००४ साली ते सेवेत रुजू झाले.
त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊ न २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यात देशात २० वे आले. त्यांची सेवेची सुरुवात सोलापूर येथून झाली.नंतर धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून बदली झाली. ते नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, नवी मुंबई महापालिकेत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन जोमाने काम करेल- जोशी
महाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासकीय शिस्त लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरी केली. यापुढे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल, आणि नागपूर शहराचा विकास गतीने होण्यास होईल, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Web Title: Tukaram Mundhe new commissioner of Nagpur NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.