‘स्कूल व्हॅन’ने घेतला पेट : विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:40 PM2019-10-01T20:40:29+5:302019-10-01T20:44:25+5:30

विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला.

Tragedy averted as empty school van catches fire | ‘स्कूल व्हॅन’ने घेतला पेट : विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला

‘स्कूल व्हॅन’ने घेतला पेट : विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील मंगसा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने ‘स्कूल व्हॅन’ रोडच्या कडेला उभी केली आणि बाजूला झाला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला. ही घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-केळवद मार्गावरील मंगसा शिवारात मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
सारस्वत पब्लिक स्कूलमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग रोज सकाळी ११ वाजता सुरू होत असल्याने चालक देवराव माणिकराव घोळसे, रा. सावनेर हे एमएच-४०/एटी-०११४ क्रमांकाची ‘स्कूल व्हॅन’ (टाटा मॅजिक) घेऊन केळवद परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात होते. ही ‘स्कूल व्हॅन’ सारस्वत पब्लिक स्कूलच्या मालकीची आहे. या ‘स्कूल व्हॅन’मध्ये इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थी रोज शाळेत ये-जा करतात.
दरम्यान, ती ‘स्कूल व्हॅन’या मार्गावरील मंगसा शिवारात पोहोचताच घोळसे यांना आत जळकट वास यायला सुरुवात झाली. संशय आल्याने त्यांनी ‘स्कूल व्हॅन’ लगेच रोडच्या बाजूला करून थांबविली आणि ती सोडून बाजूला झाले. काही वेळातच त्या ‘स्कूल व्हॅन’ने पेट घेतला. त्यावेळी ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नव्हते. हीच घटना विद्यार्थ्यांना शाळेत आणताना किंवा शाळेतून घरी पोहोचविताना घडली असती तर अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही दिसून आले. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

कंडक्टरची नियुक्ती करा
या ‘स्कूल व्हॅन’मध्ये आजनी व केळवद येथील एकूण पाच विद्यार्थी रोज शाळेत ये-जा करतात. त्या ‘स्कूल व्हॅन’मध्ये चालक व विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कुणीही नसते. ‘स्कूल व्हॅन’मधील विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कुणीतरी असायला हवे. त्यामुळे या ‘स्कूल व्हॅन’मध्ये कंडक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. ही ‘स्कूल व्हॅन’ डिझेलवर चालणारी असून, तिने शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला असावा, अशी शक्यताही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.

Web Title: Tragedy averted as empty school van catches fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.