पर्यटकांच्या टूरचे पुढे समायोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:40 PM2020-05-26T19:40:56+5:302020-05-26T19:43:19+5:30

कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. अशा स्थितीत पर्यटकांना कुठलाही आर्थिक फटका बसू न देता त्यांच्या सहलींच्या रकमेचे समायोजन त्यांनी दिलेल्या तारखांच्या सहलींमध्ये करणार असल्याची माहिती नागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

The tourist tour will be further adjusted | पर्यटकांच्या टूरचे पुढे समायोजन करणार

पर्यटकांच्या टूरचे पुढे समायोजन करणार

Next
ठळक मुद्देनागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचा निर्णय : लॉकडाऊनमुळे सर्वच टूर रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. अशा स्थितीत पर्यटकांना कुठलाही आर्थिक फटका बसू न देता त्यांच्या सहलींच्या रकमेचे समायोजन त्यांनी दिलेल्या तारखांच्या सहलींमध्ये करणार असल्याची माहिती नागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
देशपांडे म्हणाले, सहलींचे आयोजन करताना सर्वच टूर ऑपरेटर्सनी पर्यटकांकडून अग्रीम रक्कम घेतली आहे. ही रक्कम बस, विमान, निवास व्यवस्थेत गुंतविली असून परतीची शक्यता नाही. आर्थिक अडचणींमुळे प्रवाशांना रोख रक्कम आता परत करणे शक्य होणार नाही. या सर्व घटनाक्रमात पर्यटकांचे नुकसान होऊ नये म्हणून पुढील कोणत्याही सहलीत पर्यटकांचे समायोजन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यामध्ये प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटन हा विश्वासाचा व्यवसाय आहे. सहलींच्या माध्यमातून पर्यटकांना उत्तम सेवा प्रदान करीत टूर ऑपरेटर्सला उत्पन्न होते. पण यंदा आयोजन नसल्याने कंपन्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. पण हा व्यवसाय निरंतर चालणारा आहे. लोकांचा टूर आॅपरेटर्सवरील विश्वास आणि ऋषानुबंध कायम राहावे, याकरिताच असोसिएशनने निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांचा विश्वास तडीस जाऊ देणार नाही. प्रवाशांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
नागपूर जिल्ह्यात जवळपास १ लाख पर्यटकांना कोरोनाचा फटका बसला आहे. नागपुरात या व्यवसायाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५ हजार लोक जुळले आहेत. उन्हाळ्यातील सहलींवरच सर्वांचा आर्थिक कारभार चालतो. वर्षभरात नागपुरात एकूण सहलींमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात ७० टक्के आयोजन होते. पण लॉकडाऊनमुळे देशविदेशातील सर्वच सहली रद्द झाल्या आहेत. पुढेही हा व्यवसाय काही महिने बंद राहील. कारण देश विदेशाच्या सहलीची तयारी करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. त्याकरिता बस, विमान, निवास, स्थळदर्शन आणि भोजनाची व्यवस्था करावी लागते. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर आणि शासनाच्या निर्देशानुसार देशविदेशात सहलींचे आयोजन करणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

बुकिंग तारखेपासून एक वर्षात विमानाने प्रवास करता येणार
देशांतर्गत सहलींचे आयोजन करताना टूर आॅपरेटर्सनी अनेक पर्यटकांचे विमानांचे बुकिंग केले आहे. पण सहली रद्द झाल्याने प्रवास करणे शक्य नाही. अशा स्थितीत विमान कंपन्यांनी बुकिंग क्रेडिट शेअरमध्ये टाकल्या आहेत. बुकिंग तारखेपासून एका वर्षाच्या आत पर्यटकांना प्रवास करता येईल, असे देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: The tourist tour will be further adjusted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन