महाराष्ट्रातील वनपर्यटन व्यवसाय वळला मध्य प्रदेशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:36 AM2019-11-01T11:36:20+5:302019-11-01T11:41:01+5:30

सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला.

Tourism business in Maharashtra has shifted to Madhya Pradesh | महाराष्ट्रातील वनपर्यटन व्यवसाय वळला मध्य प्रदेशाकडे

महाराष्ट्रातील वनपर्यटन व्यवसाय वळला मध्य प्रदेशाकडे

Next
ठळक मुद्देदिवाळीतील वनपर्यटनाला फटका ताडोबातील व्यवसाय सर्वाधिक

गोपालकृष्ण मांडवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुट्या आणि पर्यटन याचा संबंध कायम असला तरी यंदाच्या दिवाळीतील सुट्यांमधील वनपर्यटनाचा व्यवसाय पावसामुळे बराच अडचणीत आला. नागपूरलगतचे व्याघ्र प्रकल्प पावसामुळे बाधित झाल्याने येथील ऑफलाईनचा व्यवसाय लगतच्या मध्य प्रदेशाकडे वळला. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रक ल्पाने मात्र राज्यातून सर्वाधिक व्यवसाय केला.
दरवर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होणारा वनपर्यटनाचा हंगाम यंदा अतिवृष्टी व खराब रस्त्यांच्या अडसराने १५ दिवस विलंबाने सुरू झाला. १६ ऑक्टोबरपासून संरक्षित वनक्षेत्रातील आणि अभयारण्यातील पर्यटन ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार होते. १६ ते ३१ ऑक्टोबर या काळात उमरेड-पवनी-कºहांडला, बोर व्याघ्र प्र्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य, पेंच व्याघ्र प्रकल्पातही ऑफलाईन पद्धतीने वन पर्यटन सुरू झाले. सिल्लारी गेट (पूर्व पेंच) तसेच सुरेवानी (नागलवाडी) गेटवरून वन पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यावरील पर्यटन सुरू झाले. मात्र त्यातही ऑनलाईन-ऑफलाईनचा घोळ असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. खुर्सापार गेटवरील ऑनलाईन रद्द झालेल्या पर्यटकांना तिथेच ऑफलाईनसाठी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अन्य पर्यटकांनी मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच (बॉर्डर खवासा)चा पर्याय निवडला. परिणामत: महाराष्ट्रात येऊ पहाणारा व्यवसाय मध्य प्रदेशात गेला.
नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना खुर्सापार गेटचे आकर्षण अधिक असते. मात्र अधिक समस्या याच गेटवरून आल्या. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. परिणामत: या गेटवरून दिवाळीच्या हंगामात फक्त १८ ते २० टक्के व्यवसाय मिळाला. येथील रिसॉर्टचालकांनी बरीच तयारी करून ठेवली असली तरी पर्यटकांची गर्दी कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे येथील रिसॉर्टचालक संदीप सिंग यांनी सांगितले.
या संदर्भात वनविभागाकडे विचारणा केली असता, पेंच प्रकल्पाच्या सहा गेटपैकी सिल्लारी गेटही सुरू करण्यात आले असून तिथे पर्यटकांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. २९ आणि ३० ऑक्टोबरला येथे बरीच गर्दी जाणवली. पावसामुळे अनेक रिसॉर्टस्मधील बुकिंग कमी झाले. या तुलनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत दररोज वाढच होत आहे. येथील ७५ टक्के रस्ते सुरू आहेत. पावसामुळे व्याघ्रदर्शन न घडल्याने या वेळी अनेकांची निराशा मात्र झाली. येथे कोअर सहा आणि बफरमध्ये नव्याने सुरू झालेले दोन मिळून १२ असे १८ गेट आहेत. सोमवारपर्यंत बहुतेक रिसॉर्ट बुक असल्याची माहिती येथील रिसॉर्टचालक निखील अभ्यंकर
यांनी दिली.

गर्रा खुर्सापारने केली निराशा
गर्रा खुर्सापार गेटवर ४८ वाहने रजिस्टर्ड असली तरी त्यातील सध्या फक्त २१ ते २५ वाहनेच उपलब्ध आहेत. रस्ते बंद असल्याने ऑनलाईन पर्यटन रद्द झाले. ऑफलाईन वरून येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी म्हणावी तशी नसल्याने येथील पर्यटनावर बराच ताण पडला. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला. गाईड, वाहनचालक, हॉटेल्स यांचाही व्यवसाय बराच कमी झाला. ऐन दिवाळीच्या दिवसात स्थानिकांची निराशा झाली.

ताडोबात रोज दीड हजारांवर पर्यटक
राज्यात सर्वात चांगली स्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोअरचे सहा आणि बफरचे १२ गेट पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पावसाचा अल्प परिणाम असला तरी पर्यटकांच्या गर्दीवर परिणाम झालेला नाही. मागील वर्षी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कातून येथे ११ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावर्षीही पर्यटनाचा व्यवसाय चांगला राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद कमी मिळाला, यामागे अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते हे कारण आहे. या आठवड्यात पाऊस थांबताच सुमारे ११० किलोमीटर लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल.
- अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक,
पेंच प्रकल्प

Web Title: Tourism business in Maharashtra has shifted to Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.