हा निवडणूक आयोगाचा घोळच, उमेदवारांचा भ्रमनिरास ; महसूलमंत्री बावनकुळे यांची टीका
By योगेश पांडे | Updated: December 2, 2025 20:39 IST2025-12-02T20:38:22+5:302025-12-02T20:39:46+5:30
Nagpur : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकांचा निकाल लांबणीवर गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

This is a mess by the Election Commission, the candidates are disappointed; Revenue Minister Bawankule criticizes
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकांचा निकाल लांबणीवर गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणचे खटले न्यायालयात प्रलंबित होते, फक्त त्याच ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत, असे बावनकुळे म्हणाले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या प्रकारामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला असून याला सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध आहे. राज्य सरकारने अनेकदा निवडणूक आयोगाशी चर्चा केली व पत्रव्यवहारदेखील केला. परंतु आयोगाने कुठलीही दखल घेतली नाही. हा घोळ अनाकलनीय आहे. येणाऱ्या निवडणुका मोठ्या आहेत, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा घोळ संपवावा. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागितल्याची माहिती आहे. आयोगाने जे चुकीचे झाले ते दुरुस्त केलेच पाहिजे. राज्याच्या जनतेस वेठीस धरणे योग्य नाही. राज्य निवडणूक आयोगाला कोणी सल्ला दिला हे माहित नाही. आम्ही २५ वर्षांपासून निवडणुका लढवत आहोत, परंतु असा घोळ कधीच पाहिला नाही. राज्य निवडणूक आयोग पहिल्यांदाच अशी चूक करताना दिसत आहे, त्यामुळे आमची तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नाही
राज्य शासनाचा यात हस्तक्षेप असल्याचा आरोप विरोधकांतील काही जण करीत आहेत. मात्र राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.