आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:26 IST2025-12-07T09:26:12+5:302025-12-07T09:26:49+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी शनिवारी ‘लोकमत’ भवनला भेट दिली. त्यावेळी वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील कुणीही मुख्यमंत्री झाले तरी विदर्भाच्या विकासासाठी एकतर्फी निधी देऊ शकत नाही.

आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
नागपूर : राज्याच्या सत्तेत मराठा समाजाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. विदर्भात दलित, आदिवासी व ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळे विदर्भ राज्य आवश्यक आहे. अधिवेशनानंतर आपण काही आमदारांना सोबत घेऊन दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेऊ. त्यांना याचे महत्त्व समजावून सांगू आणि वेगळ्या विदर्भासाठी मोहीम सुरू करू, असे काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी शनिवारी ‘लोकमत’ भवनला भेट दिली. त्यावेळी वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील कुणीही मुख्यमंत्री झाले तरी विदर्भाच्या विकासासाठी एकतर्फी निधी देऊ शकत नाही. त्यामुळे विदर्भातील संसाधनांच्या बळावर स्वतंत्र राज्य हाच एकमेव मार्ग आहे.
जमीन वाटपाची श्वेतपत्रिका काढा
२०१० ते २०२५ या १५ वर्षांच्या कालावधीत शासकीय, गायरान, वतन, इनाम व निस्ताराच्या जमिनी कुणा कुणाला दिल्या याची श्वेतपत्रिका याच अधिवेशनात सरकारने काढावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.