There is no shortcut to success: Banavarilal Purohit | यशाला शॉर्टकट नसतो : बनवारीलाल पुरोहित
स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराने जोसेफ राव व धर्मेंद्र जोरे यांचा गौरव करताना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. सोबत गिरीश गांधी, अजय संचेती, सत्यनारायण नुवाल, प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रीपाठी.

ठळक मुद्देस्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार : जोसेफ राव, धर्मेंद्र जोरे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जोसेफ राव आणि धर्मेंद्र जोरे या दोन ज्येष्ठ पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती होते. व्यासपीठावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, राहुल पांडे उपस्थित होते. यावेळी २१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ या स्वरूपाचा पुरस्कार देऊन दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्यपाल पुढे म्हणाले, समर्पणातूनच पत्रकारितेचे क्षेत्र मोठे झाले आहे. शिफारशीतून पत्रकारिता क्षेत्र चालत नाही. विदर्भातील पत्रकारितेचा स्तर मोठा असून येथील पत्रकारांचा राज्यात दबदबा आहे. आज तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी त्या काळात मर्यादित तंत्रज्ञानाच्या बळावर केलेली पत्रकारिता बरीच मूल्ये शिकवून गेली आहे. स्व. अनिलकुमार यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे पत्रकारिता केली. मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. समारंभाला ज्येष्ठ पत्रकारांसह तरुण पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवपत्रकारांना संदेश देताना ते म्हणाले, जुन्यांचे अनुभव ऐका, त्यातून स्वत:ला घडवा. पत्रकारिता ही समाजसेवेची संधी आहे. मनाला नियंत्रित ठेवण्याचा हा मार्ग आहे, जो महात्मा गांधीनी सांगितला होता. काळ जरा वेगळा आहे, पारदर्शी राहा. समाज आणि कुटुंबाच्या मनात विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
आढावा ग्रंथ तयार करा
आजवर पत्रकार संघाने ज्या पत्रकारांना स्व. अनिलकुमार स्मृती पुरस्कार दिले, त्या सर्व पत्रकारांचे कार्य मोठे आहे. या सर्वांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा स्मृतिग्रंथ काढा, अशी सूचना राज्यपाल पुरोहित यांनी केली. पत्रकारितेतील पुढच्या पिढीसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना धर्मेंद्र जोरे म्हणाले, हा आपणासाठी कौटुंबिक सोहळा आहे. पत्रकाराचे काम कुरिअरमॅनसारखे आहे. समाजापर्यंत तंतोतंत माहिती पोहचविण्याचे आव्हान यात असते. समाजमाध्यमांच्या आजच्या काळात खातरजमा करूनच समाजापर्यंत माहिती पोहचेल, याचेही समाजभान आवश्यक आहे. व्यक्त होण्यावर कालही निर्बंध होते, आजही आहेत. त्यासाठी शालजोडीतून लेखन करण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसरे सत्कारमूर्ती जोसेफ राव यांनीही मनोगत व्यक्त केले.
अजय संचेती यांनी आपल्या मनोगतामधून अनिलकुमार यांच्या कार्याचा गौरव केला. पत्रकारितेचे मूल्य जोपासणाऱ्या दोन्ही पत्रकारांना हा पुरस्कार दिल्याने चीज झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. सत्कारमूर्र्तींचा परिचय राहुल पांडे यांनी करून दिला. संचालन रेखा दंडिगे यांनी तर आभार वर्षा बासू यांनी मानले.

 

Web Title: There is no shortcut to success: Banavarilal Purohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.