सातपुड्याच्या पायथ्यातील गावात मूत्रपिंड विकाराचे सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 07:30 AM2022-05-22T07:30:00+5:302022-05-22T07:30:01+5:30

Nagpur News सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. शासनाने याला गंभीरतेने घेऊन उपाययोजना करायला हव्यात, असे मत वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.

The highest number of patients with kidney disease in the foothills of Satpuda | सातपुड्याच्या पायथ्यातील गावात मूत्रपिंड विकाराचे सर्वाधिक रुग्ण

सातपुड्याच्या पायथ्यातील गावात मूत्रपिंड विकाराचे सर्वाधिक रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे रक्तदाब, मधुमेहाचाही मूत्रपिंडाला धोका

नागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु, हे दोन आजार नसतानाही सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’शी बोलताना डॉ. उखळकर म्हणाले, हिंगोली, पांढरकवडा, बुलढाणा, अकोला, अमरावती, पुसद, दिग्रस, घाटंजी, नांदेड येथे मधुमेह व रक्तदाब नसताना मूत्रपिंड निकामी होणारे रुग्ण आढळून येतात. विशेषत: बंजारा समाजात याचे प्रमाण मोठे आहे. विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर हे एक यामागील कारण असावे. यातील बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. यामुळे डायलिसीस व मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या खर्चिक उपचारातून त्यांना जावे लागते. अनेकांना हे झेपत नसल्याने मृत्यूचा आकडाही मोठा आहे.

- प्रदूषणाचाही प्रभाव

कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे प्रदूषित झालेली पिके, जमीन, हवा व पाण्यामुळेही मूत्रपिंडाचे विकार वाढल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे, विहीरी व बोअरवेलचे पाणी खूप खोल गेले आहे. ढोबळ मानाने या पाण्याची तपासणी होत नसल्याने विषारी क्षारांची नोंदणीच होत नाही. विकाराला हेही एक कारण असावे.

- २०४०पर्यंत मूत्रपिंडाचे विकार पाचव्या क्रमांकावर

मूत्रपिंड विकारामुळे येणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०१६मध्ये अकराव्या क्रमांकावर होते. शासनाने याला गंभीरतेने न घेतल्यास २०४०पर्यंत हे प्रमाण पाचव्या क्रमांकावर जाऊ शकते. जागतिक किडनी कौन्सिलने संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) ही बाब मांडली आहे.

- शासनाने या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या कराव्यात

डॉ. उखळकर म्हणाले, ज्या गावांमध्ये मूत्रपिंड विकाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येतात, त्या गावांतील सरसकट सर्वांची शासनाने ‘क्रिएटिनीन’सह लघवी, हिमोग्लोबीन व रक्तदाबाची चाचणी करायला हवी. यामुळे आजार गंभीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर उपचार होऊन त्यांचे जीव वाचतील.

Web Title: The highest number of patients with kidney disease in the foothills of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य