TBZ director fraud with high court | टीबीझेड संचालकानी केली उच्च न्यायालयाशी धोकेबाजी

टीबीझेड संचालकानी केली उच्च न्यायालयाशी धोकेबाजी

ठळक मुद्देजमानतीसाठी सादर केले बोगस दस्तावेज : सदर पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : दीड किलो सोन्यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वकिलाची फसवणूक करणाऱ्या बहुचर्चित टीबीझेड ज्वेलर्सचे संचालक हेमंत झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात बोगस दस्तावेज सादर केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूर्वीच फसवणूक व एमपीआयडी अन्वये कारवाई झालेल्या झवेरींच्या अडचणी आणखी वाढल्या आहे.
काटोल रोड येथील रहिवासी वकील मनीष देशराज यांनी २०१५ मध्ये छावणीच्या पुनम चेंबर येथील त्रिभुवनदास भिमजी झवेरी यांच्याकडे ३८ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोने जमा केले होते. सुरुवातीला काही महिने टीबीझेडचे संचालक हेमंत झवेरी यांनी देशराज यांना व्याज दिले. व्याज देणे बंद केल्यानंतर देशराज यांनी त्यांच्याकडे तगादा लावला. अखेर देशराज यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २०१८ मध्ये सदर पोलिसांनी झवेरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर झवेरी यांनी देशराज यांना प्रत्येक महिन्याला ३.५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण झवेरी यांंनी ते दिले नाही. तीन महिन्यापूर्वी झवेरी व त्याचा भाचा सागर झवेरी याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा तसेच एमपीआयडी अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वकिलांनी मनीष देशराज यांना पैशाच्या मोबदल्यात सोने परत करण्यात आल्यासंदर्भात १० चेक व ६ पावत्या सादर केल्या. पावतीत झवेरी यांनी ३.५० लाख रुपयांच्या बदल्यात देशराज यांना सोने परत केल्याचा उल्लेख होता. पावतीवर देशराज यांच्या सह्या सुद्धा होत्या. पण सह्या बनावट असल्याचे देशराज यांचे म्हणणे होते. देशराज यांची माहिती गंभीरतेने घेऊन उच्च न्यायालयाने सदर पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. सदर पोलिसांनी तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. यात झवेरी यांच्या वकिलाकडून न्यायालयात सादर केलेले दस्तावेज बोगस असल्याचा खुलासा केला. या आधारे सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. झवेरी चार वर्षापूर्वी शोरूम बंद करून मुंबईला पळाला आहे. त्याने गुंतवणुकीच्या नावावर अनेक लोकांसोबत धोकेबाजी केली आहे. हे प्रकरण झवेरीसाठी अडचणी निर्माण करणार आहे. यात त्याला अटकही होऊ शकते.

Web Title: TBZ director fraud with high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.