उन्हाच्या लाटेत लहानग्यांची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 08:48 PM2020-05-30T20:48:54+5:302020-05-30T20:50:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची लाट आली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक धोका लहान मुले व वृद्धांना होऊ शकतो. विशेषत: लहानग्यांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ व आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व माजी सचिव डॉ. मंजुषा गिरी यांनी केले आहे.

Take care of the little ones in the heat wave | उन्हाच्या लाटेत लहानग्यांची काळजी घ्या

उन्हाच्या लाटेत लहानग्यांची काळजी घ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची लाट आली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक धोका लहान मुले व वृद्धांना होऊ शकतो. विशेषत: लहानग्यांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ व आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व माजी सचिव डॉ. मंजुषा गिरी यांनी केले आहे. त्यांच्यानुसार लहान मुलांच्या शरीराच्या तापमानाचा समतोल राखणारी यंत्रणा पूर्णपणे विकसित झालेली नसते. वाढत्या तापमानामुळे ऊन लागून ताप येऊ शकतो. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
डॉ. झुनझुनवाला म्हणाले, सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. या काळात लहान मुलांनी आणि मोठ्यांनीही घराच्या बाहेर जाणे टाळावे. जर बाहेर जायची गरज पडलीच तर अधिक द्रव्य पदार्थांचे सेवन करणे, लहानग्यांच्या शरीराचे रक्षण होईल, अशा प्रकारचे कपडे घालून देणे, लहान बाळ असेल तर त्यास अधिकचे स्तनपान करणे या गोष्टींचे विशेष भान ठेवावे. दर तासाला जाणीवपूर्वक पाणी अथवा ताक, लिंबूपाणी, सत्तूचे पेय, आंब्याचे पन्हे, नारळपाणी आणि ‘ओआरएस’सारख्या द्रव्य पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
डॉ. गिरी म्हणाल्या की, लहान मुलांची त्वचा फार संवेदनशील असते. मेललिनचे प्रमाणही फार कमी असते. उन्हातील अतिनील किरणांमुळे त्वचेला आघात होतो. स्टीमसेल्सला हानी पोहचते. दीर्घकाळापर्यंत त्वचा अतिनील किरणांच्या सान्निध्यात आली तर मोठेपणी त्वचेचे विकार आणि कर्करोगही संभवतो. त्यामुळे घरातून बाहेर निघण्याच्या अर्धातासापूर्वी लहानग्यांना किमान ३० एसपीएफ तीव्रतेची सनस्क्रीम लावणे आवश्यक आहे.

एसी-कुलरच्या रूममध्ये जाणे-येणे केल्यानेही ताप येऊ शकतो
घरातही प्रत्येक रूमचे तापमान सारखे नसते. त्यामुळे कुलर अथवा एसीमधून, एसी-कुलर नसलेल्या रूममध्ये जाणे-येणे केल्यानेदेखील ताप येऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांनी हे टाळायला हवे. खेळताना लहान मुलांना तहान लागल्याचे भानदेखील नसते. मात्र, पालकांनी आपला पाल्य पुरेसे पाणी पितोय ना, याची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. झुनझुनवाला आणि डॉ. गिरी यांनी स्पष्ट केले.

लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
तापाची लक्षण असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जावे. अलीकडे प्रत्येक ताप आलेल्या व्यक्तीला कोरोना तर नाही ना, असा संशय येतो. मात्र, ताप येण्याचे अनेक कारण असू शकतात. त्यापैकी एक कारण हे ऊन लागणे होय. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देतील. ऊन लागण्याची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सोबतच तातडीने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, नळाच्या पाण्याने आंघोळ करणे, पेय अथवा हलका आहार देणे यासारखे उपाय करू शकतात.

ऊन लागण्याची लक्षणे
तीव्र ताप
घाम येणे बंद होणे
बेशुद्धी
पातळ संडास
उलट्या
पोटात दुखणे
अंगावर पुरळ
लघवीचे कमी प्रमाण
गडद रंगाची लघवी

Web Title: Take care of the little ones in the heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.