काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 10:38 AM2021-12-09T10:38:38+5:302021-12-09T11:16:12+5:30

माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र उर्फ छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा. काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे.

suspition of replacing congress candidate ravindra bhoyar to mangesh deshmukh in vidhan parishad election | काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार?

काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार?

Next
ठळक मुद्देसुनील केदारांनी सूत्रे हाती घेतली दिल्लीच्या निर्णयाकडे नजरा

कमलेश वानखेडे

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अंतर्गत वादळ उठले आहे. भाजपमधून आयात करीत उमेदवारी दिलेले रवींद्र भोयर यांची उमेदवारीच बदलण्यात यावी, यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच आग्रह धरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा. काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे. आता अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेली भोयर यांची उमेदवारी हायकमांड बदलेला का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

अ.भा. काँग्रेस समितीच्या संमतीनेच भोयर यांची उमेदवारी जाहीर झाली होती. संघ परिवारातील सदस्य व गडकरी-फडणवीस यांच्या शहरातील भाजपचाच नगरसेवक फोडून दाखविल्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. भोयर हे चमत्कार घडवतील, असा दावा देवडिया काँग्रेस भवनात आयोजित भोयर यांच्या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस नेत्यांनी छाती फुगवून केला होता. मात्र, गेल्या आठवडाभरात काँग्रेसमधील घटनाक्रम झपाट्याने बदलला. भोयर हे ताकदीने निवडणूक लढत नाहीत, काँग्रेसच्या मतदारांशी देखील संपर्क साधण्यात कमी पडत आहेत, असा सूर पक्षात सुरू झाला. एकाएक क्रीडा मंत्री सुनील केदार सक्रिय झाले. उमेदवार बदलण्याची भूमिका घेत त्यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली.

पटोले, केदार, राऊत यांच्यात दोन दिवसांपूर्वीच मंथन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व क्रीडा मंत्री सुनील केदार व पालकमंत्री नितीन राऊत यांच्यात रविभवनात बैठक झाली. तीत केदार यांनी भोयर यांच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीची ‘जबाबदारी’ आम्ही घेतो पण आता उमेदवार बदला, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांसमोर ताकदीने मांडण्यात आला. पटोले यांनीही एकूणच परिस्थिती पाहून मंत्र्यांच्या भूमिकेला विरोध करणे टाळले. हायकमांड यावर काय निर्णय घेते ते पाहू, या तोडग्यावर ही बैठक संपली, अशी खात्रीलायक माहिती आहे.

खास लोकांनाच गुप्त निरोप

दोन दिवसापांसून केदार यांनी सदरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये ‘कॅम्प’ उघडला आहे. मंगळवारी या हॉटेलमध्ये कामठी, मौदा, कुही यासह इतर तालुक्यातील नगरसेवकांना बोलावून बैठक घेण्यात आली. यानंतर बुधवारी नागपुरातील नगरसेवकांचा एक गट व काही जिल्हा परिषद सदस्यांना बोलावण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केदार यांनी त्यांच्या खास लोकांना गुप्त निरोप दिले आहेत. हायकमांडकडून निर्णय येईपर्यंत यावर उघड चर्चा करून नका, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केदार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही दुपारी बैठक झाली. तीत माजी मंत्री रमेश बंग, जि.प. सदस्य सलिल देशमुख, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. यानंतर पुन्हा रात्री उशिरा पर्यंत केदार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू होती.

मंगेश देशमुख हॉटेलच्या दुसऱ्या खोलीत

हॉटेल तुलीमध्ये उपस्थित असलेल्या सूत्रानुसार काँग्रेस नेते व मतदारांची दिवसभर हॉटेलमध्ये ये-जा सुरू होती. बैठका सुरू होत्या. या दरम्यान अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हे याच हॉटेलमध्ये दुसऱ्या खोलीत बराच वेळ उपस्थित होते. मात्र, काँग्रेसच्या कुठल्याही मतदारांशी देशमुख यांची भेट करून देण्यात आली नाही किंवा चर्चाही झाली नाही.

शेतकरी भवनातील बैठकीत शिक्कामोर्तब

बुधवारी सकाळी शेतकरी भवन येथे सुनील केदार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे आदी उपस्थित होते. उमेदवार रवींद्र भोयर मात्र उपस्थित नव्हते. यावेळी उमेदवार बदलण्याच्या प्रस्तावावर उघड चर्चा झाली. चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करून उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली.

भोयर म्हणतात भाजप अफवा पसरवतेय

दरम्यान, याबाबत रवींद्र भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजप पराभवाच्या भीतीने अशा अफवा पसरवित असल्याचा आरोप केला. आपण रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अ.भा. काँग्रेस समितीने पक्ष काढून उमेदवारी जाहीर केली. एबी फॉर्म दिला. पहिल्या दिवसापासून काँग्रेसचे सर्व नेते आपल्या सोबत ताकदीने आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: suspition of replacing congress candidate ravindra bhoyar to mangesh deshmukh in vidhan parishad election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.