नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 08:24 PM2020-03-13T20:24:54+5:302020-03-13T20:36:19+5:30

महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Suspected death of Chief Engineer of Mahavitaran in Nagpur | नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्या की अपघात? : मालगाडीखाली कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महावितरणने हा अपघात असल्याचा दावा केला आहे. परंतु आत्महत्येची शक्यताही नाकारता येत नाही. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना यामुळे धक्का बसला आहे.


दिलीप घुगल (५३) बऱ्याच काळापासून महावितरणच्या प्रादेशिक संचालक पदाचा पदभार सांभाळत होते. ते आपल्या नातेवाईकाला घेण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर पोहोचले होते, असा दावा महावितरणने केला आहे. दरम्यान त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे ते प्लॅटफार्मवर पडून मालगाडीच्या संपर्कात आले. ही घटना रेल्वेस्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात घुगल प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मुंबई एण्डकडे जाताना स्पष्ट दिसत आहेत. ते प्लॅटफार्मवरून उतरून पार्सल कार्यालय आणि आरआरआय कॅबिनकडे जाताना दिसले. काही दूर अंतरावर जाऊन ते पुन्हा परत आले. दरम्यान ते मालगाडीच्या दोन वॅगनच्या मध्ये गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. यात त्यांचे दोन्ही पाय कटले आहेत. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांच्या तपासात त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान पोलिसांनी काटोल मार्गावरील महावितरणच्या कार्यालयात घुगल यांच्या कक्षाचीही तपासणी केली.
दोन वेळा गेले रेल्वेस्थानकावर

घुगल दोन वेळा रेलवेस्थानकावर आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली आहे. ते सुरुवातीला ११ वाजता रेल्वेस्थानकावर आले. काही वेळानंतर ते रेल्वेस्थानकावरून निघाले आणि पुन्हा दुपारी १२ वाजता रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी आपल्या वाहन चालकाला आपल्या नातेवाईकाला घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यामुळे चालक बाहेरच थांबला. त्यानंतर थोड्या वेळातच ही घटना घडली.

कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू केला प्रवास
दिलीप घुगल मूळचे नागपूरचेच आहेत. ते कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावामुळे लोकप्रिय होते. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूरवरून आपला प्रवास सुरू केला. १९९९ मध्ये ते काटोल रोड शाखा कार्यालयातून कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचले. २०११ मध्ये ते थेट भरतीने अधीक्षक अभियंता झाले. २०१६ मध्ये त्यांनी चंद्रपूर परिमंडळात मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला. मे २०१८ पासून ते नागपूर परिमंडळात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. जानेवारी २०१९ पासून ते प्रभारी प्रादेशिक संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते.

Web Title: Suspected death of Chief Engineer of Mahavitaran in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.