भिन्न रक्तगटातही किडनी प्रत्यारोपण यशस्वी; मध्यभारतातील दुसरे प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 07:45 AM2021-06-20T07:45:00+5:302021-06-20T07:45:02+5:30

Nagpur News नवे तंत्रज्ञान व औषधोपचारांमुळे भिन्न रक्तगट असले तरी किडनी प्रत्यारोपण होत आहे. अशाच प्रकारचे मध्य भारतातील दुसरे किडनी प्रत्यारोपण नुकतेच नागपुरात झाले.

Successful kidney transplants in different blood groups; The second transplant in Central India | भिन्न रक्तगटातही किडनी प्रत्यारोपण यशस्वी; मध्यभारतातील दुसरे प्रत्यारोपण

भिन्न रक्तगटातही किडनी प्रत्यारोपण यशस्वी; मध्यभारतातील दुसरे प्रत्यारोपण

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नीने दिली पतीला किडनी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मूत्रपिंड (किडनी) दाता असतानाही अनेकदा रक्तगट जुळत (मॅच) नसल्याने रुग्णाला ‘डायलिसीस’वर जीवन जगावे लागायचे. परंतु आता नवे तंत्रज्ञान व औषधोपचारांमुळे भिन्न रक्तगट असले तरी किडनी प्रत्यारोपण होत आहे. अशाच प्रकारचे मध्य भारतातील दुसरे किडनी प्रत्यारोपण नुकतेच नागपुरात झाले. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. आश्विनीकुमार खांडेकर यांनी आपले अनुभव व कौशल्याचा बळावर एका रुग्णाला जीवनदान दिले.

राजेश गढीकर त्या रुग्णाचे नाव. राजेश हे व्यवसायाने शिक्षक आहे. त्यांना मधुमेह असल्याने मूत्रपिंडावर त्याचा प्रभाव पडला. मूत्रपिंड निकामी झाल्याने २०२० पासून ते डायलिसीसवर होते. त्यांच्या पत्नी अर्चना गढीकर यांनी मूत्रपिंड देण्यात पुढाकार घेतला. परंतु त्यांचा रक्तगट ‘एबी’ तर पतीचा रक्तगट ‘बी’ होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अश्विनकुमार खांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, बी रक्तगट असलेल्या व्यक्ती केवळ ‘बी ’किंवा ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीचे मूत्रपिंड स्वीकारू शकतात. अशा वेळी प्रत्यारोपण करायचे असल्यास विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊन शरीरातील ‘अ‍ॅन्टीजेन’ कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच प्रकारे तीन ते पाच वेळा प्लाझ्मा एक्सचेंज करून देखील हे ‘अ‍ॅन्टीजेन’ विशिष्ट पातळीच्या खाली आणावे लागते. राजेश गढीकर यांच्या प्रकरणात इंजेक्शननंतर ‘अ‍ॅन्टीजेन’चा स्तर प्रत्यारोपणास सुयोग्य असल्याचे आढळून आले. यामुळे प्लाझ्मा एक्सचेंज करण्याची गरज भासली नाही. प्रत्यारोपणानंतर रुग्णाला संसर्ग होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु रुग्णालयातून सुटी झाल्यावर अवघ्या एका महिन्यातच त्यांना कोरोना झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्याची औषधे दिली जात असल्याने धोका अधिक होता. मात्र, त्यातूनही त्यांना सुखरुप बाहेर काढले. प्रत्यारोपणाला आता तीन महिने पूर्ण झाले आहे. दाता आणि रुग्ण दोघांची प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. खांडेकर यांच्या नेतृत्वात युरोलॉजिस्ट डॉ. रवि देशमुख, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. स्वानंद चौधरी, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. दीपाली गोमासे व नितीन चोपडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरवर्षी दोन लाख लोकांना डायलिसीसची गरज असते. मात्र, ५ ते ८ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपणच होतात. अशा वेळी भिन्न रक्तगट असलेले मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्यायही उपलब्ध आहे. यामुळे डायलिसीस वरील अवलंबित्व कमी होऊन जीवन सुसह्य होऊ शकते.

डॉ. आश्विनीकुमार खांडेकर, नेफ्रोलॉजिस्ट

Web Title: Successful kidney transplants in different blood groups; The second transplant in Central India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य