साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:06 PM2020-03-25T20:06:41+5:302020-03-25T20:08:57+5:30

माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिला.

 Strict action against the hoarders and black marketer | साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली कायदा-सुव्यवस्था व परिस्थितीची पाहणी : प्रशासनाच्या कामाचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'लॉकडाऊन'च्या काळात किराणा, दूध, भाजी,फळे, औषधी अशा सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या संदर्भात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिला.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या भागात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित विभागाचे समन्वयक राजेंद्र करवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम सुरू असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शासनपातळीवर योग्य प्रकारचे नियोजन करण्यात येत असून नागरिकांनी संयम बाळगावा आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.

आस्थेने केली विचारपूस
नितीन राऊत यांनी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आपण कुठे जात आहात, काही अत्यावश्यक काम आहे काय, अशी आस्थेने विचारपूस केली तर किराणा दुकान, भाजी बाजार, दुकानदार, फळ विक्रेते यांच्याशी संवाद साधला व काही अडचणी असल्यास सांगा असे म्हटले. त्यानंतर बर्डी उड्डाणपुलाखालील गरीब-निराधार व्यक्तीला जेवणाची व्यवस्था होत आहे काय, अशी विचारपूस केली. संविधान चौक, इंदोरा चौक, जरीपटका मार्के ट, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्गे, पारडी, वर्धमाननगर, सेन्ट्रल एव्हेन्यू रोड, गांधीबाग, इतवारी, चितारओळ, मोमिनपुरा, मेयो, सीताबर्डी, छत्रपती चौक, जयताळा रोड, बजाजनगर, शंकरनगर, गोकुळपेठ फळ-भाजी मार्केट,लॉ कॉलेज इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिक, दुकानदार, विक्रेते यांचेशी संवाद साधला व सद्यस्थिती जाणून घेतली.

Web Title:  Strict action against the hoarders and black marketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.