विठूरायाच्या वारीचे राज्यातील नियोजन आज पंढरपुरात ठरणार; एसटी महामंडळाची तयारी

By नरेश डोंगरे | Updated: June 10, 2025 20:31 IST2025-06-10T20:29:57+5:302025-06-10T20:31:08+5:30

आज अधिकाऱ्यांची बैठक : ५ हजारांवर लालपरीची सेवा

State planning for Vithuraya's journey will be decided in Pandharpur today; ST Corporation's preparations | विठूरायाच्या वारीचे राज्यातील नियोजन आज पंढरपुरात ठरणार; एसटी महामंडळाची तयारी

State planning for Vithuraya's journey will be decided in Pandharpur today; ST Corporation's preparations

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेल्या लाखो भाविकांना पंढरीची वारी घडविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बुधवारी ११ जूनला एसटीच्या शिर्षस्थ अधिकारी-पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पंढरपूरला पार पडणार आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरात देश-विदेशातील भाविक एकत्र होत असले तरी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील भाविकांची संख्या त्यात लक्षणिय असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसूसलेले असतात. ते आषाढी एकादशीची वर्षभर वाट बघत असतात. यावर्षी ६ जुलैला आषाढी एकादशी अर्थात पंढरपूरची यात्रा आहे. प्रवास भाड्यात सुट मिळत असल्यामुळे आणि गावातूनच सेवा मिळत असल्याने शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील भाविकही एसटी बसेसनेच पंढरपूरची वारी करण्याला प्राधान्य देतात. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता आषाढी एकादशीला पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या आवागमनात कसूर होऊ नये म्हणून एसटी मंडळाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, आज पंढरपुरात एसटी महामंडळाच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. यात राज्यातील कोणत्या विभागातून किती बसेस पंढरपूरसाठी सोडायच्या त्याचे नियोजन केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी ८ दिवसांच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसह राज्यातून ५ हजारांवर एसटी बसेस पंढरपूर स्पेशल म्हणून राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यातील एक हजारांवर बसेस या विदर्भातून सोडल्या जाणार आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी !

राज्यातील विविध भागातून येणाऱ्या बसचालकांना, वाहकांना अडचण किंवा संभ्रम होऊ नये म्हणून गेल्या वर्षीपासून विभागवार स्वतंत्र बसस्थानकांची व्यवस्था करण्यात येते. गेल्या वर्षी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सातारा, पुणे आणि पंढरपूर आगाराच्या बसेससाठी चंद्रभागा बसस्थानकाची व्यवस्था झाली होती. तर, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगरच्या बसेससाठी भीमायात्रा देगांव बसस्थानकाची सोय करण्यात आली होती. नाशिक विभागासाठी विठ्ठल कारखाना बसस्थानक तर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधूदुर्गच्या बसेससाठी पांडूरंग बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली होती. याच बसस्थानकांतून नमूद विभागांमधील बसेसचे संचालन करण्यात आल्याने बसचे चालक, वाहक तसेच प्रवाशांनाही सुविधाजनक झाले होते.

Web Title: State planning for Vithuraya's journey will be decided in Pandharpur today; ST Corporation's preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.