राज्य सांस्कृतिक पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:27 AM2019-09-14T11:27:51+5:302019-09-14T11:29:29+5:30

यंदा दिल्या गेलेल्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये गुणवत्तेचाच घोळ असल्याचे वृत्त लोकमतने ५ सप्टेंबर रोजी विश्लेषणासह उघडकीस आणले होते. त्यानंतर, याच वृत्ताची दखल घेत शहरातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी उघड उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

State Cultural Awards Around Suspect! | राज्य सांस्कृतिक पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात!

राज्य सांस्कृतिक पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात!

Next
ठळक मुद्देसरकारने खऱ्या ‘रत्ना’ला डावललेतज्ज्ञ कलावंत शासनाला घेरण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०१९साठी दिल्या गेलेले राज्य सांस्कृतिक पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून, ‘शुभ्र दिसणाऱ्या रसायनाला दूध समजणाऱ्या’ वृत्तीवर जाणकार मंडळींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याबाबत तूर्तास बोलणे टाळून, तीव्र प्रतिक्रिया शासनदरबारी मांडण्याची तयारी सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ कलावंतांनी चालविली आहे.
यंदा दिल्या गेलेल्या पुरस्कारांमध्ये गुणवत्तेचाच घोळ असल्याचे वृत्त लोकमतने ५ सप्टेंबर रोजी विश्लेषणासह उघडकीस आणले होते. त्यानंतर, याच वृत्ताची दखल घेत शहरातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी उघड उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कला प्रकारातील १२ ज्येष्ठ कलावंतांना २०१९ साठी पुरस्कृत करण्यात आले. त्यात शास्त्रीय नृत्य प्रकारात नागपूरच्या प्रसिद्ध भरतनाट्यम् गुरु रत्नम जनार्दनम यांची निवड केली होती आणि आॅगस्टच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदानही करण्यात आला. मात्र, भरतनाट्यमच्या गुरुंना दिलेला हा पुरस्कार ‘मोहिनीअट्टम’ या केरळच्या शास्त्रीय नृत्यासाठी विशेष कामगिरी म्हणूनचा होता. मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारात जनार्दनम यांची कोणतीही उल्लेखनीय अशी कामगिरी नसताना, त्यांना हा पुरस्कार का दिला गेला, असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता.
विशेष म्हणजे, सरकारने असे करून या नृत्यप्रकारात गेली अनेक वर्षे रक्ताचे पाणी करणाऱ्या एका ज्येष्ठ गुरुंना डाववल्याचा आरोप शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील जाणकारांकडून केला जात आहे. एका अर्थाने खऱ्या रत्नाला डावलून, केवळ नृत्य येते म्हणून सन्मान करणे हा संपूर्ण कलाक्षेत्राचाच अपमान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पुरस्कार देणाऱ्यावर आक्षेप, घेणाऱ्याबद्दल आम्ही काय बोलावे?
पुरस्कार कुणाला द्यावे आणि कुणी घ्यावे, हा आमचा विषय नाही. मात्र, दिला जाणारा पुरस्कार कुणाला, कशासाठी दिला जातो, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. देणाऱ्यांनी शहानिशा न करता, वाट्टेल तशा प्रकारे पुरस्कार द्यावा आणि घेणाऱ्यानेही कुठलाही विचार न करता तो पुरस्कार घ्यावा, हे योग्य नाही. एकूणच, या प्रक्रियेमुळे सांस्कृतिक संचालनालय, दिला गेलेला पुरस्कार आणि ज्याने पुरस्कार स्वीकारला.. असे तिघेही आणि एकंदर ही संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद असल्याने, हा एका दर्जेदार पुरस्काराचा अपमान असल्याची भावना प्रख्यात भरतनाट्यम् गुरु श्रीमती माडखोलकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

या घोळामुळे मालिनी मेनन प्रकाशात
पुरस्काराच्या या घोळामुळे ‘मोहिनीअट्टम’ हा नृत्यप्रकार जपणाऱ्या आणि विद्यार्थिनी घडविणाऱ्या ज्येष्ठ नृत्यगुरू मालिनी मेनन प्रकाशझोतात आल्या, हे विशेष. या पुरस्कारापूर्वी मोहिनीअट्टम विदर्भातच नाही, असे चित्र होते. मात्र, गेल्या २१ वर्षापासून नागपुरात त्या मोहिनीअट्टमचे धडे विद्यार्थिनींना देत आहेत. त्यांच्याकडून अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या नृत्यप्रकारात २० विद्यार्थिनी पारंगत झाल्या आहेत. मोहिनीअट्टम ही नृत्यकला शिकविणाऱ्या मालिनी यांना डावलून भरतनाट्यम शिकविणाऱ्या नृत्यगुरुला केवळ मोहिनीअट्टम करता येते म्हणून, पुरस्कृत करणे ही शुद्ध फसवेगिरी असल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: State Cultural Awards Around Suspect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.