कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:01 PM2020-03-23T21:01:21+5:302020-03-23T21:02:31+5:30

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.

Start a new laboratory for the diagnosis of corona in five places: High Court orders government | कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश

कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश

Next
ठळक मुद्देनागपूर मेडिकल, अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूरचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.
यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने रेकॉर्डवरील माहिती लक्षात घेता विविध महत्त्वपूर्ण आदेश दिले. विदर्भामध्ये केवळ नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातच ‘व्हीआरडीएल’ आहे. या लेबॉरेटरीवर संपूर्ण विदर्भासह तेलंगणा, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील रुग्णांचा भार आहे. त्यामुळे वरील ठिकाणी तातडीने ‘व्हीआरडीएल’ कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कोरोना निदानाकरिता निकषानुसार सुविधा असलेल्या खासगी प्रयोगशाळांनाही रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी मान्यता व नोंदणी देण्यावर एक आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश केंद्र व राज्य सरकारला दिले. नागपुरात डॉ. शैलेश मुंधडा यांच्या प्रयोगशाळेत कोरोना निदानाची सुविधा आहे. परंतु केंद्र व राज्य सरकारने या प्रयोगशाळेला कोरोना निदानाची मान्यता दिली नाही. खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचा खर्च सुमारे नऊ हजार रुपये आहे. परंतु हा खर्च करण्यास तयार असलेल्या रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत पाठविता येऊ शकते. त्यामुळे सरकारी प्रयोगशाळेवरील भार कमी होईल. तसेच सरकारने कर सवलत व अनुदान दिल्यास चाचणीचा खर्चही नियंत्रणात ठेवता येईल, असे न्यायालयाला सदर निर्देशापूर्वी सांगण्यात आले. न्यायालयात वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, अ‍ॅड. अनुप गिल्डा, अ‍ॅड. राम हेडा, अ‍ॅड. सुधीर पुराणिक आदींनी युक्तिवाद केला.
--------
कारागृहात स्वतंत्र वॉर्ड, विमान प्रवाशांची तपासणी
मध्यवर्ती कारागृहात कोरोनाग्रस्त बंदिवानांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. तसेच नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांचा ताप तपासला जात नाही, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने संपूर्ण विदर्भातील मध्यवर्ती कारागृहांमध्ये कोरोनाग्रस्त बंदिवानांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात यावेत आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रत्येक विमान प्रवाशाचा ताप मोजण्यात यावा, असे आदेश राज्य सरकारला दिले.

Web Title: Start a new laboratory for the diagnosis of corona in five places: High Court orders government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.