एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 03:44 PM2021-10-12T15:44:29+5:302021-10-12T15:47:21+5:30

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

ST ran out of diesel, students stuck at home | एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले

एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले

Next
ठळक मुद्देग्रामीणमध्ये एसटी महामंडळाला डिझेलचा तुटवडा : फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेला सुट्टी

नागपूर : ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्याने एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी होत होती. पण एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढल्याच नाही, उलट डिझेलच्या कारणाने आहे त्या फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

ग्रामीण भागामध्ये शाळेय विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास अतिशय सोयीचा व आर्थिक दृष्ट्या परवडणारा असतो. एसटी महामंडळही विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटीच्या पासेस उपलब्ध करून देते. कोरोनात दीड वर्षापेक्षा अधिक काळ शाळा बंद होत्या. विद्यार्थीही घरीच असल्याने ग्रामीण भागात महामंडळाने काही फेऱ्या कमी केल्या होत्या. परंतु ग्रामीण भागात १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ ची शाळा सुरू झाली.

शाळांनी बसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी महामंडळाला पत्र दिल्यानंतर शाळेच्या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. आता ४ ऑक्टोबरपासून वर्ग ५ ते ७ च्या देखील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त आहे. पण प्रवासी व्यवस्था सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपले आहे. त्यामुळे डेपोंमध्ये एसटीच्या बसेस उभ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

- बसच्या फेऱ्या शाळेच्या वेळेत नाही

माहुली गावात राहणारी मनिषा शेंडे या विद्यार्थीनीची शाळा २० किलोमीटरवर आहे. मनिषा म्हणाली शाळेत पोहचण्यासाठी एसटी हे एकमेव साधण आहे. शाळा सुरू झाल्यापासून बस सुरू झाली आहे. पण बसची फेरी शाळेच्या वेळेत नाही. त्यामुळे आमचे पहिल्या तासाचे लेक्चर सुटते. परतीच्या वेळेतही शाळा सुटण्याच्या पूर्वीच बस येत असल्याने आम्हाला शेवटचे लेक्चर सोडावे लागते. आता कालपासून बसच आली नाही. त्यामुळे शाळेत जावू शकली नाही.

काळाफाटा येथील दिनेश आदेवार म्हणाले की गावात बस सुरू व्हावी म्हणून आम्ही आमदाराला पत्र पाठविले. गावकऱ्यांचे सह्यांचे पत्र डेपो मॅनेजरला दिले. पण बस सुरू झाली नाही. आमच्या गावातील २५ विद्यार्थी दीड किलोमीटर दूर जावून बस पकडतात. बस नसल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे धाडस करीत नाही.

शाळेच्या मुख्यध्यापक राजश्री उखरे म्हणाल्या, ''आमच्या शाळेतील ४०० विद्यार्थी बसचे प्रवास करतात. असे असतानाही शाळेच्या वेळेत बसच्या फेऱ्या कमी आहेत. शाळेच्या वेळेत बस पोहचतही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पहिल्या तासिकेचे नुकसान होते. परतीच्या प्रवासातही शाळा सुटण्यापूर्वी बस येऊन जाते. त्यामुळे आम्हाला शेवटच्या तासिकेपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे लागते. गेल्या दोन दिवसापासून बसेस बंद आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात डेपोत विचारले असता त्यांनी सांगितले की डिझेल संपले आहे. हा प्रकार शाळा सुरू झाल्यापासून बरेचदा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.''

डिझेल अभावी ग्रामीणच्या काही भागातील बसफेऱ्या बंद आहे. लवकरच डिझेलची व्यवस्था करून बसफेऱ्या सुरू करण्यात येईल.

- तनुजा काळमेघ, विभागीय वाहतूक अधिकारी, नागपूर विभाग

Web Title: ST ran out of diesel, students stuck at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.