वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:49 PM2019-11-12T23:49:46+5:302019-11-12T23:54:28+5:30

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Soon to change in the Vanchi Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

Next
ठळक मुद्देभारिप आघाडीत विलीन : २० नोव्हेंबरनंतर सर्व जिल्हास्तरावर बदलाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई दादरमधील आंबेडकर भवनात भारिपसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमसारख्या राजकीय पक्षांशिवाय फक्त सामाजिक संघटनांचाच समावेश होता. मात्र २१ ऑक्टोबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीबाहेर पडली. यानंतर विधानसभा निवडणुका होताच भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा हा निर्णय झाला आहे. यामुळे भारिपचे पदाधिकारीच २० नोव्हेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारिपच्या वंचित बहुजन आघाडीमधील विलिनीकरणानंतर ‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भावनिक नाते जोडतो, त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाला आणि व कार्यकर्त्यांना ‘रिपब्लिकन’ शब्दाचे विशेष महत्व आहे. भारिपच्या विलयामुळे रिपब्लिकन हा शब्दच हटविला गेला असल्याने आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ, असा पक्षातील नाराजांचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात वंचित बहुजन आघाडीमध्ये फटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकत्र काम करण्याची संधी मिळणार : डबरसे
या संदर्भात प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सागर डबरासे म्हणाले, भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय पार्टी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत झाले आहे. यामुळे आता आघाडीला एकाच मंचावर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. विद्यमान भारिप पदाधिकारीच वंचित बहुजन आघाडीमध्येसुद्धा त्याच पदावर काम करतील. पुढील २० नोव्हेंबरपर्यंत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कमिट्यांचे गठन केले जाईल.

Web Title: Soon to change in the Vanchi Bahujan Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.