नागपूर शहरातील धक्कादायक स्थिती : ६,५४१ मधून २५१ खाटा रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 11:38 PM2021-04-02T23:38:34+5:302021-04-02T23:40:26+5:30

Out of 6,541, 251 beds are vacant नागपूर जिल्ह्यात रोज कोरोनाबाधितांचे ३,५०० ते ४,००० रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मृतांची संख्या ६० वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचे केवळ ३, आयसीयूचे ६ तर ऑक्सिजनचे ७२ बेड रिकामे होते.

Shocking situation in Nagpur city: Out of 6,541, 251 beds are vacant | नागपूर शहरातील धक्कादायक स्थिती : ६,५४१ मधून २५१ खाटा रिकाम्या

नागपूर शहरातील धक्कादायक स्थिती : ६,५४१ मधून २५१ खाटा रिकाम्या

Next
ठळक मुद्देव्हेंटिलेटरच्या केवळ सहा खाटा शिल्लक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत शहरात ९ शासकीय व ९४ खासगी रुग्णालये मिळून ६,५४१ खाटा आहेत. शुक्रवारी सायंकाळी यातील केवळ २५१ खाटा रिकाम्या होत्या. यात ऑक्सिजनच्या २२०, आयसीयूच्या २५ तर व्हेंटिलेटरच्या ६ खाटांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचे केवळ ३, आयसीयूचे ६ तर ऑक्सिजनचे ७२ बेड रिकामे होते.

नागपूर जिल्ह्यात रोज कोरोनाबाधितांचे ३,५०० ते ४,००० रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मृतांची संख्या ६० वर गेली आहे. यामुळे आणखी १००० ऑक्सिजन खाटांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मेयो, मेडिकल, एम्स, मनपाचे गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल, सदर येथील आयुष हॉस्पिटल, हिंगणा व सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे हॉस्पिटल असे मिळून २,०२९ शासकीय बेड आहेत. यात १६०० बेड ऑक्सिजनचे, २५९ बेड आयसीयूचे तर १७० बेड व्हेंटिलेटरचे आहेत. खासगी कोविड हॉस्पिटल मिळून ४,५१२ बेड आहेत. यातील ३,१५४ बेड ऑक्सिजनचे, १,०९० बेड आयसीयूचे तर २६८ बेड व्हेंटिलेटरचे आहेत. खासगीमध्ये शुक्रवार सायंकाळपर्यंत १४८ ऑक्सिजन, १९ आयसीयू तर ३ व्हेंटिलेटरचे बेड रिकामे होते.

मेडिकलने दोन दिवसात वाढविले ६० बेड

मेडिकलने गुरुवारी व शुक्रवारी ६० बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. त्यानुसार रुग्णालयात बेडची संख्या ६७० झाली आहे. मेडिकल आणखी २३० खाटा सुरू करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी ‘लोकमत’ला दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, वाढत्या बेडसोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे.

मेयो, एम्स फुल्ल

मेयो रुग्णालयात ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल तर एम्समध्ये ६० खाटांचे कोविड हेल्थ हॉस्पिटल फुल्ल झाले आहे. येथील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. मेयो व एम्समध्ये आणखी खाटा वाढविण्याची गरज आहे.

शासकीय रुग्णालयातील बेडची स्थिती

एकूण बेड : रिकामे बेड (शुक्रवारी सायंकाळपर्यंत)

ऑक्सिजन बेड : १६००: ७२

आयसीयू बेड : २५९: ०६

व्हेंटिलेटर बेड : १७०: ०३

 खासगी रुग्णालयातील बेडची स्थिती

एकूण बेड : रिकामे बेड (शुक्रवारी सायंकाळपर्यंत)

ऑक्सिजन बेड : ३,१५४: १४८

आयसीयू बेड : १,०९०: १९

व्हेंटिलेटर बेड : २६८: ०३

 खासगी कोविड हॉस्पिटलमधील असे आहेत शासनाचे दर

जनरल वॉर्ड विलगीकरणात : ४,००० प्रति दिवस

आयसीयू (व्हेंटिलेटरशिवाय) : ७,५९९ प्रति दिवस

आयसीयू (व्हेंटिलेटरसह) : ९,००० प्रति दिवस

यात पीपीई किटपासून ते महत्त्वाच्या चाचण्या व औषधांचा खर्चाचा समावेश नाही.

 बेड उपलब्ध नसल्यास व तक्रारीसाठी मनपाने ०७१२-२५६७०२१ किंवा ०७१२-२५५१८६६ हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे.

Web Title: Shocking situation in Nagpur city: Out of 6,541, 251 beds are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.