धक्कादायक ! आरोग्य योजना, कोट्यवधीचा खर्च तरीही राज्यात दर महिन्याला हजारावर नवजात बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:35 IST2025-12-02T17:30:50+5:302025-12-02T17:35:53+5:30

Nagpur : १ ते ५ वर्षे वयोगटात बालकांच्या मृत्यूमध्ये ९ टक्क्यांनी वाढ

Shocking! Despite spending crores on health schemes, more than a thousand newborns die every month in the state | धक्कादायक ! आरोग्य योजना, कोट्यवधीचा खर्च तरीही राज्यात दर महिन्याला हजारावर नवजात बालकांचा मृत्यू

Shocking! Despite spending crores on health schemes, more than a thousand newborns die every month in the state

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधींचा खर्च, लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या आहे. ४३ महिन्यांत ४३,६६२ नवजात बालकांच्या म्हणजे दर महिन्याला एक हजाराहून अधिक मृत्युची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे १ ते ५ वर्षाच्या मुलांतील मृत्यूदरात ९.५४ टक्क्यांची वाढ झाल्याने चिंता आणखी वाढली आहे.

शासनाने बालकांसाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ अॅम्ब्युलन्सची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ्य मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सेवा व मानवविकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो.

त्यानंतरही शून्य ते १ आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. 

११,५६० नवजात बालकांचा मृत्यू मागील वर्षी

सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शून्य ते १ वर्षे वयोगटात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत १४,९३८, एप्रिल २०२३ ते २०२४ या कालावधीत ११,८४९, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ११,५६० तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ५,३१५ म्हणजे ४३ महिन्यांत तब्बल ४३,६६२ बालकांचा मृत्यू झाला.

१ ते ५ वर्षे वयोगटात ७,३८५ मृत्यू

१ ते ५ वर्षे वयोगटात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २,२१२ एप्रिल २०२३ ते २०२४ या कालावधीत १,९६१, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २,१६८ तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १,०४४ म्हणजे ४३ महिन्यांत तब्बल ७,३८५ बालकांचा मृत्यू झाला.

एक हजार नवजात शिशूमध्ये ११ मृत्यू

उपलब्ध माहितीनुसार, राज्यात ० ते २८ दिवसांच्या १००० नवजात शिशूमध्ये मृत्यूचा दर ११ आहे. ० ते १ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये मृत्यूदर १४ तर ५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये मृत्यूचा दर १६ आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये ५ वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर ६ असताना महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक आहे.

मृत्यूची ही आहेत कारणे

बालरोग तज्ज्ञांनुसार, ० ते १ वर्षे वयोगटात नवजात शिशूच्या मृत्यू मागे अकाली जन्म (प्री-मॅच्युरिटी), कमी वजन, जन्मवेळी श्वसनाची समस्या, अस्वच्छ ठिकाणी प्रसूती, सेप्सिस, न्यूमोनिया, मेंजायटीस सारखी इन्फेक्शन्स ही कारणे आहेत तर, १ ते ५ वर्षे वयोगटात न्यूमोनिया, जुलाब, कुपोषण, जन्मजात दोष व अपघात ही काही मुख्य कारणे आहेत.

"शहरांमध्ये बालरोग तज्ज्ञ जवळपास ७० ते ७५ टक्के असताना गाव-खेड्यात त्यांची संख्या केवळ २५ ते ३० टक्के आहे. ही संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे. याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, तंत्रज्ञांची आणि प्रशिक्षित हेल्थ वर्करची मोठी कमतरता आहे. गाव-खेड्यातून रुग्णांना शहरात पाठवण्यासाठी अद्ययावत सोयीसुविधांचा अभाव, हेदेखील बालमृत्यूला कारणीभूत आहे. सरकारने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."
- डॉ. वसंत खळतकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स

Web Title : स्वास्थ्य पर करोड़ों खर्च के बावजूद महाराष्ट्र में शिशु मृत्यु दर चिंताजनक

Web Summary : सरकारी स्वास्थ्य योजनाओं के बावजूद, महाराष्ट्र में शिशु मृत्यु दर अधिक है। 43 महीनों में 43,662 नवजात शिशुओं की मृत्यु हुई। 1-5 वर्ष के बच्चों में मृत्यु दर 9.54% बढ़ी। ग्रामीण क्षेत्रों में विशेषज्ञों की कमी और अपर्याप्त सुविधाएं संकट का कारण हैं।

Web Title : Alarming Infant Mortality Rate in Maharashtra Despite Crores Spent on Healthcare

Web Summary : Despite government health schemes, Maharashtra faces a high infant mortality rate. Over 43 months, 43,662 newborns died. Mortality in 1-5 year olds increased by 9.54%. Lack of specialists in rural areas and inadequate facilities contribute to the crisis.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.