तिने घेतली रेल्वेसमोर उडी... नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:46 AM2020-03-10T00:46:04+5:302020-03-10T00:48:12+5:30

एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले.

She took the jump in front of the train ... sensation at Nagpur railway station | तिने घेतली रेल्वेसमोर उडी... नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

तिने घेतली रेल्वेसमोर उडी... नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

Next
ठळक मुद्दे प्रवाशाने ओढले प्लॅटफार्मवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली.
मोमिनपुरा येथील रहिवासी कल्पना (वय ५५, बदललेले नाव) सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर आली. ती प्लॅटफार्म क्रमांक ६ वर मुंबई एण्डच्या दिशेने गेली. त्याच वेळी २२६२० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर येत होती. प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत होते. कल्पनाही प्रवाशांसह प्लॅटफॉर्मवर थांबली होती. गाडी स्टेशनच्या आत पोहोचली. गाडी जवळ येत असतानाचे पाहून कल्पनाने रेल्वे रुळावर उडी घेतली. लोकोपायलट आर.पी. सरदार, सहायक लोकोपायलट डी. मंडल यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ब्रेक लावला. काही वेळातच गाडी थांबली. गाडी थांबली तेव्हा कल्पना आणि गाडी यांच्यातील अंतर केवळ एक ते दीड फुटाचे होते. त्याच वेळी जरीपटका निवासी राम पंजवानी हा तरुण वडिलांना सोडायला आला असता त्याने कल्पनाला मदतीचा हात देऊन प्लॅटफार्मवर ओढले. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव आणि सतीश ढाकणे यांनी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला सूचना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय पटले घटनास्थळी पोहोचले. महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. कल्पनाला एक मुलगा आहे. ती तणावात घरून निघाल्याचे समजते. काही वेळानंतर ती शांत होताच लोहमार्ग पोलिसांनी तिला घरी पोहोचविले.
दरम्यान, आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभान अहिरवार, एस. पी. सिंग प्लॅटफॉर्मवरून जात असताना त्यांनी महिलेची आस्थेनी विचारपूस करून तिला दिलासा दिला. गाडीचे गार्ड ए.के. चौधरी यांनीही कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला.
लोहमार्ग पोलिसांची माहिती देण्यास टाळाटाळ
सोमवारी संबंधित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिसांनी तिला ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर तिला तिच्या घरी पोहोचविले. परंतु याबाबत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी लोहमार्ग पोलिसांना विचारणा केली असता असे काहीच झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता ही घटना अतिशय किरकोळ असल्याचे सांगून हात झटकले.

Web Title: She took the jump in front of the train ... sensation at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.