स्वत:चे व्यंगचित्र पाहून शास्त्रीजी खळखळून हसले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 08:32 PM2018-05-05T20:32:42+5:302018-05-05T20:32:54+5:30

महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात राहणाऱ्या शास्त्रीजींचा सतरंजीवर बसलेला कार्टून मी काढले आणि ते पाहून शास्त्रीजी खळखळून हसले. ६० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून सेवा देणारे व वयाची पंच्यांशी गाठलेल्या विष्णू आकुलवार यांनी लोकमतशी बोलताना आठवणींना उजाळा दिला.

Shastriji laughed after seeing his own cartoon ... | स्वत:चे व्यंगचित्र पाहून शास्त्रीजी खळखळून हसले...

स्वत:चे व्यंगचित्र पाहून शास्त्रीजी खळखळून हसले...

Next
ठळक मुद्देव्यंगचित्रकार विष्णू आकुलवार यांनी दिला आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : त्यावेळी मी रेल्वेच्या खात्यात दिल्लीमध्ये सेवा देत होतो. त्यावेळी लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री होते. आमच्या नात्यात असलेले महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात राहणाऱ्या शास्त्रीजींचा सतरंजीवर बसलेला कार्टून मी काढले आणि ते पाहून शास्त्रीजी खळखळून हसले. ६० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून सेवा देणारे व वयाची पंच्यांशी गाठलेल्या विष्णू आकुलवार यांनी लोकमतशी बोलताना आठवणींना उजाळा दिला.
शाळेत असताना ब्रिटिश वर्तमानपत्रांमधील कार्टून पाहून ते काढण्याची आवड निर्माण झाली व आयुष्यभर वाढतच गेली. पुढे रेल्वेत नोकरीवर लागल्यानंतरही ही आवड जोपासली. त्यावेळी विभागाकडून परवानगी घेऊन नवभारत या हिंदी दैनिकात कार्टून काढायचो. त्यावेळचे अनेक व्यंगचित्र खूप गाजले होते. स्कॉयलॅब पडणार ही भीती सर्वत्र पसरली होती. त्यावेळी पंतप्रधान असलेले मोरारजी देसाई यांच्यावरील व्यंगचित्र पहिल्या पानावर झळकलं. ‘आकाशाकडे पाहणाऱ्या मोरारजींची खुर्ची मागे सरकत आहे’ हे व्यंगचित्र खूपच गाजले होते. देसाई अर्थमंत्री असताना देशाला सोने विकावे लागले होते. त्यावेळी काढलेल्या टीकात्मक व्यंगचित्रामुळे खूप वादळ उठले होते व मंत्रालयाकडून थेट दिल्लीला बोलावण्यात आले. त्यावेळी नागपूरहून भीतभीतच दिल्लीला गेलो. मात्र मोरारजींनी रागावण्याऐवजी स्वागत करून स्वीस घडी भेट दिल्याची आठवणही त्यांनी नमूद केली. बांगलादेश निर्माण करणाऱ्या इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या व्यंगचित्राची आठवणही त्यांनी सांगितली. आज व्यंगचित्र काढण्यासारखे अनेक विषय आहेत. तरुणांनी पगाराकडे न बघता या क्षेत्रात यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बाबूजींना खास आवडायचे कार्टून
विष्णू आकुलवार यांनी लोकमतमध्येही काही वर्षे सेवा दिली आहे. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांना माझे व्यंगचित्र खास आवडायचे. ते खास बोलावून व्यंगचित्र काढण्यासाठी सांगत असल्याचे आकुलवार यांनी सांगितले.
प्रथम पृष्ठावर मिळावी जागा
आधी वर्तमानपत्रांच्या प्रथम पृष्ठावर व्यंगचित्रासाठी खास जागा ठेवली जायची. वाचकांची नजर व्यंगचित्रांकडेच जायची व त्याचा वेगळा प्रभाव असायचा. मात्र आता प्रथम पृष्ठावरून कार्टून दिसेनासे झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. व्यंगचित्रांना प्रथम पृष्ठावर जागा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Shastriji laughed after seeing his own cartoon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.