नोकराची आत्महत्या : नागपुरातील मधूर वाईन शॉपच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 09:02 PM2019-09-23T21:02:06+5:302019-09-23T21:03:34+5:30

कामाचे पैसे मागणाऱ्या नोकराला मधूर वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी यांनी कटकारस्थान करून खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. कळमना पोलिसांनी वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Servant Suicide: A crime against a trio including the owner of Madhur wine shop in Nagpur | नोकराची आत्महत्या : नागपुरातील मधूर वाईन शॉपच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

नोकराची आत्महत्या : नागपुरातील मधूर वाईन शॉपच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देखोट्या गुन्ह्यात गोवले : आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामाचे पैसे मागणाऱ्या नोकराला मधूर वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी यांनी कटकारस्थान करून खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यामुळे व्यथित झालेल्या अतुल प्रभाकर ठवरे (वय २९) नामक तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी कारणीभूत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाल्यामुळे कळमना पोलिसांनी या तिघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला.
कळमन्याच्या नेताजीनगरात राहणाऱ्या अतुलने २० ऑ गस्ट २०१९ ला दुपारी गळफास लावून आत्महत्या केली होती. अतुल सीताबर्डीतील मधूर वाईन शॉपमध्ये नोकर होता. त्याच्या भावाचे लग्न असल्यामुळे अतुलने ९ मे २०१९ ला चार दिवसांची सुटी घेतली होती. लग्न आटोपल्यानंतर तो कामावर परत गेला असता, तेथील व्यवस्थापक शेखर सोनकुसरे याने तुला कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. त्यामुळे अतुल दडपणात आला. त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी चहाची टपरी लावली. मात्र, ती चालत नव्हती. आपल्या कामाचे थकीत पैसे मिळावे म्हणून वाईन शॉपचा मालक आरोपी विशाल जयस्वाल याच्याकडे चकरा मारत होता. मात्र, आरोपी जयस्वाल तसेच व्यवस्थापक शेखर सोनकुसरे आणि शेखर बोरकर अतुलला शिवीगाळ करून त्रास देत होते. प्रचंड मानसिक दडपणात असलेल्या अतुलने ३१ मे रोजी वृत्तपत्रात एक बातमी वाचली. त्यात त्याने (अतुलने) वाईन शॉपचा मालक आणि व्यवस्थापकाला ५० लाखांची खंडणी मागितल्यामुळे बोरकरच्या तक्रारीवरून अतुलवर वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे नमूद होते. या बातमीमुळे अतुल प्रचंड दडपणात आला. कटकारस्थान करून वाईन शॉपचा मालक आणि दोन्ही व्यवस्थापकांनी आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. आता आपल्याला पोलीस अटक करतील, आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे म्हणून अतुल सारखा रडत होता. या अवस्थेत त्याने २० ऑगस्टला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, मृत्युपूर्वी अतुलने सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आरोपी विशाल जयस्वाल, शेखर बोरकर तसेच शेखर सोनकुसरेचे कुकृत्य लिहून ठेवले.
त्यामुळे अतुलची पत्नी मनीषा (वय २७) हिची तक्रार नोंदवून घेत कळमना पोलिसांनी रविवारी आरोपी विशाल जयस्वाल, शेखर बोरकर आणि शेखर सोनकुसरे या तिघांविरुद्ध अतुलच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विशाल जयस्वाल तसेच बोरकर आणि सोनकुसरेने अतुल ठवरेविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा एका एसएमएसच्या आधारे दाखल केला. विशेष म्हणजे, वाडी पोलिसांनीही हा गुन्हा दाखल करताना तत्परता दाखवली. पोलिसांनीच लावलेल्या अंदाजाप्रमाणे कामाचे पैसे मागण्यासाठी अतुलने हा मेसेज केला असावा, त्यात पाच हजारांच्या पुढे अनावधानाने शून्याची बटन अनेकवेळा दबली असावी. अतुल भितऱ्या (भेकड) स्वभावाचा होता. तो एवढी मोठी खंडणी कशी काय मागेल, याचाही विचार करण्यात आला नाही अन् एका तरुणाचा नाहक बळी घेतला गेला. त्यामुळे त्याचा परिवार उघड्यावर आला आहे. कळमना पोलिसांनी या प्रकरणी बोरकर आणि सोनकुसरेंना अटक केली. जयस्वाल फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Servant Suicide: A crime against a trio including the owner of Madhur wine shop in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.