एससी-एसटी-ओबीसींनो, आपली सत्ता मिळवा: प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:08 PM2019-07-26T22:08:21+5:302019-07-26T23:00:25+5:30

प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

SC-ST-OBCs get their power: Prakash Ambedkar | एससी-एसटी-ओबीसींनो, आपली सत्ता मिळवा: प्रकाश आंबेडकर

एससी-एसटी-ओबीसींनो, आपली सत्ता मिळवा: प्रकाश आंबेडकर

Next
ठळक मुद्देस्कॉलरशिप परिषदेत आवाहन

नागपूर : आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गुलाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर शासन आपल्या हातात असायला हवे. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवून काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे पाठवा. एस.सी., एस.टी., ओबीसी, व्हीजेएनटी सत्तेत बसले तर त्यांना कुणाला न्याय  मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केले.

संजीवनी ह्यमन डेव्हलपमेंट संस्था, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन विद्यार्थी संघ, युवाज वुई द युथ आदींसह विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, स्कॉलरशिपचा विषय आपण गेल्या ४० वर्षातही सोडवू शकलो नाही. १९७२ मध्ये ज्यावर बोलले जात होते. तेच आजही बोलतो. परंतु तेव्हा समस्यांवर उपायसुद्धा सुचविले जायचे. आज ती परिस्थिती दिसत नाही. विषम परिस्थिती व विषम शिक्षण जोपर्यंत आहे. तसेच शासन शिक्षणाची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत आरक्षण व स्कॉलरशिप मिळायलाच हवी. महाराष्ट्र सरकार हे सर्वाधिक प्रतिगामी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार जितकी स्कॉलरशिप देते तितकीच विद्यार्थ्यांना मिळते. राज्य सरकारचा त्यात कुठलाही हिस्सा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष सुनील पाल, समता सैनिक दलाच्या अ‍ॅड. स्मिता कांबळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे विलास उईके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल खोब्रागडे, डॉ. आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन प्रीतम बुलकुंडे यांनी केले. प्रफुल भालेराव यांनी आभार मानले. प्रज्ञा सालवटकर, लक्ष्मीकांत सुदामे, नवनीत कांबळे, सम्राट उंदीरवाडे, धम्मपाल माटे, मनीष पाटील, प्रवीण वानखेडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते, याची सर्वानाच माहिती आहे. परंतु का केले, हे मात्र कुणाला सांगता येत नाही. विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते. ते देशातील शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे केंद्र ठरू शकते, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला मत द्यायला हवे, असे नागपूरच्या जनतेला वाटते. पण आपण येथे २८ टक्के आहोत. इतर समाजाला सोबत घेऊन आपण स्वत:च इथले सत्ताधारी होऊ शकतो, असे मात्र तुम्हाला वाटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

स्कॉलरशिप मिळायलाच हवी , पण जे विद्यार्थीच नाही त्यांचे काय?
आपण टीकाकार आहोत, निर्माते नाहीत, अशी टीका आपल्यावर नेहमी केली जाते. त्यामुळे आता आपल्याला निर्मात्यांच्या भूमिकेत यावे लागेल. स्कॉलरशिपचा मुद्दा हा विद्यार्थ्यांशी संंबंधित आहे. स्कॉलरशिप मिळायलाच हवी. परंतु जे विद्यार्थी होऊ शकले नाही, त्यांचे काय? त्यांचा विचारही करावा लागेल. ते विद्यार्थी कसे होतील, हे पाहावे लागेल. सर्वानांच शिक्षण मिळायला हवे. या देशातील व्यक्ती किमान दहावीपर्यंत शिकलेली असावी, यासाठी दहावीपर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी मागणी आपली असायला हवी, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: SC-ST-OBCs get their power: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.