भाजपाच्या ‘मिशन-बिहार’ला संघाचे बळ; प्रचारात स्वयंसेवक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:27 AM2020-11-03T07:27:34+5:302020-11-03T07:28:04+5:30

Bihar Election RSS Nagpur News मागील वेळचा अनुभव व राष्ट्रीय राजकारणात या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील यंदा कंबर कसली आहे.

Sangh's strength to BJP's 'Mission-Bihar'; Volunteers active in the campaign | भाजपाच्या ‘मिशन-बिहार’ला संघाचे बळ; प्रचारात स्वयंसेवक सक्रिय

भाजपाच्या ‘मिशन-बिहार’ला संघाचे बळ; प्रचारात स्वयंसेवक सक्रिय

Next
ठळक मुद्देगेल्या वेळी ठेचाळल्याने जागृत झाले ‘संघ’भान

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. मागील वेळी सरसंघचालकांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यामुळे संघाने फारशी सक्रिय भूमिका घेतली नव्हती. मात्र मागील वेळचा अनुभव व राष्ट्रीय राजकारणात या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील यंदा कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांतदेखील संघाचे स्वयंसेवक उतरले असून प्रत्यक्ष भाजपचे नाव न घेता प्रचार करण्यात येत आहे. विशेषत: नवे मतदार व मतदानाची टक्केवारी वाढावी यावर जास्त भर देण्यात येत असल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली आहे.

निवडणुका जाहीर होण्याअगोदरपासूनच संघ स्वयंसेवकांचे काम सुरू झाले होते. ‘ऑनलाईन’ माध्यमावर मतदानवाढीचे आवाहन तर करण्यात येत आहेच. शिवाय गृहसंपर्कादरम्यान प्रत्यक्ष भाजपाचे नाव घेण्यात येत नसले तरी कुठल्या पक्षाला मतदान करावे याचे संकेत देत संघ स्वयंसेवक जनतेमध्ये जात आहेत. बिहारच्या प्रगतीसाठी चांगल्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, तसेच मतदान करणे किती आवश्यक आहे व एका मतामुळे काय फरक पडू शकतो इत्यादी मुद्यांवर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला संबंधित कुटुंब, मोहल्ला पातळीवर पोहोचविणे सुरू झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय, स्थानिक मुद्यांचे दाखलेदेखील दिले जात आहेत, अशी माहिती बिहारमध्ये प्रचारयंत्रणेत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरुण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मतदारसंघनिहाय चमूंवर जबाबदारी

मतदारसंघनिहाय संघ स्वयंसेवकांच्या चमूंचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचारादरम्यान कुठेही भाजप किंवा उमेदवाराचे नाव घ्यायचे नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील चमू तयार करण्यात आल्या असून मतदानवाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत.

२०१५ मध्ये बसला होता फटका

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात संघ परिवारातील सदस्य सक्रिय होते. मात्र २०१५ मध्ये बिहार निवडणुकांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी त्याच मुद्याला प्रचाराचा केंद्रबिंदू केले होते. त्यामुळे त्यावेळी स्वयंसेवक प्रचारात सक्रिय नव्हते.

Web Title: Sangh's strength to BJP's 'Mission-Bihar'; Volunteers active in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.