महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 10:08 PM2022-08-17T22:08:13+5:302022-08-17T22:08:39+5:30

Nagpur News महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

Salvation of women is beyond the power of men | महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

Next
ठळक मुद्देअखिल भारतीय महिला चरित्र कोशाचे लोकार्पण

नागपूर : भारतीय परंपरेत महिलांना मातृशक्तीचे स्थान दिले असले तरी दोन हजार वर्षांत विविध आक्रमणांमुळे महिलांची हवी तशी प्रगती होऊ शकली नाही. सार्वजनिक जीवनात राहून महिला यशाचे शिखर गाठू शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. महिलांचा उद्धार करण्याची भाषा पुरुष करतात; परंतु महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघमित्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला चरित्र कोशाच्या पहिल्या खंडाचे बुधवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, डॉ. विद्या देवधर, डॉ. मेघा ब्रह्मापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर महिला सक्षमीकरण आवश्यकच आहे. मात्र जी गोष्ट लहान मुलांना समजते ती अनेकदा मोठे लोक आचरणात आणत नाही. महिलांच्या उद्धारासाठी व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. मात्र देशातील विविधता पाहता भारतातील महिलांच्या समस्या, त्यावरील उपाय वेगवेगळे आहेत. जगात महिला श्रेष्ठ की पुरुष यावर चर्चा होते. मात्र, आपल्या प्राचीन संस्कृतीत दोघांनाही समान स्थान देण्यात आले होते. परकीय आक्रमणानंतर आपण महिलांचे श्रेष्ठत्व विसरत गेलो. मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांच्या घरात मातृशक्तीचे स्थान अबाधित आहे का, याचा विचार करायला हवा. मातृशक्ती उत्थान हा खरे तर पुरुषांच्याच प्रबोधनाचा विषय आहे. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरापासूनच व्हावी, असे सरसंघचालक म्हणाले.

देशातील महिलांमध्ये पृथ्वीसारखी सहनशीलता आहे. सामान्य घरातील गृहिणींमध्येदेखील असामान्य कर्तृत्व असते. जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करणे हा भारतीय महिलांचा गुण आहे. भारतीय महिलांचा आदर्श जगभरात पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रेरणादायी चरित्रे अभ्यासक्रमातून शिकविली गेली पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या. चित्रा जोशी यांनी पुस्तक परिचय केला.

भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन

आपल्या देशाचा इतिहास प्रेरणादायी होता. मात्र, इंग्रजांच्या काळात भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन सुरू झाले व ती फॅशन झाली. आजच्या अनेक घटनांनादेखील भूतकाळाशी जोडण्यात येते. आपल्या कुटुंब व्यवस्थेला लोक नावे ठेवत होते. मात्र, आज जगभरात आपल्या कुटुंब व्यवस्थेवर अभ्यास होत आहे. भारतीय संस्कृतीबाबत आपला दृष्टिकोन चुकला असल्याची जाणीव आता पाश्चिमात्यांना होत आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

Web Title: Salvation of women is beyond the power of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.