आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:21 PM2020-09-21T12:21:45+5:302020-09-21T12:22:14+5:30

नागपूर शहरात अनेक ठिकाणी आयएसआय मार्क नसलेले आणि दर्जा नसलेले स्टीमर, मास्क तसेच सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे आरोग्याचा नवा प्रश्न होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Sale of substandard goods in the name of health protection | आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय?

आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय?

Next
ठळक मुद्देफूटपाथवर मिळतात स्टीमर आणि मास्क 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक स्वत:चे आरोग्य जपायला लागला आहे. याचा फायदा घेऊन आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री करण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी आयएसआय मार्क नसलेले आणि दर्जा नसलेले स्टीमर, मास्क तसेच सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे आरोग्याचा नवा प्रश्न होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दररोज नियमितपणे वाफ घेतल्यामुळे कोरोना पळतो असा प्रचार सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी आता सहकुटुंब वाफारे घेणे सुरू केले आहे. यासाठी औषधांच्या दुकानांमध्ये चांगल्या दर्जाचे स्टीमर मिळतात. या स्टीमरचा दर्जा चांगला असल्यास व त्यासाठी वापरले गेलेले फायबर प्लास्टिक चांगल्या दर्जाचे असल्यास पाणी उकळल्यावर त्याचा परिणाम या प्लास्टिकवर होत नाही. परिणामत: श्वसनावरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही. परंतु वाफारे घेण्याचे प्रमाण या काळात वाढल्यामुळे अर्थात स्टीमरची देखील मागणी वाढली आहे. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी कसली गुणवत्ता न जोपासता बाजारात स्टीमर आणले आहेत. त्यात वापरले गेलेले प्लास्टिक कशा दर्जाचे आहे हे तपासण्याची गरज आहे. अगदी अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत हे स्टीमर फूटपाथवर उपलब्ध होत असल्याने अनेकजण दर्जा न तपासता ते विकत घेतात, परंतु त्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक दर्जाहीन असल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्टीमरसोबतच मास्क देखील मोठ्या प्रमाणात फूटपाथवर विक्रीला आहेत. कसलीही स्वच्छता न पाळता सहजपणे ते रस्त्यावर विकले जातात. या माध्यमातून नकळतपणे कोरोनाचे विषाणू पसरण्याचा धोका आहे. सॅनिटायझर स्प्रे देखील दर्जाहीन निर्मितीतून बनले गेले असल्याने ते लवकर निकामी होतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. आरोग्याच्या काळजीने पदरमोड करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

 

Web Title: Sale of substandard goods in the name of health protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.