खाद्यतेलाच्या पुनर्वापरामुळे जीवाला धोका : १ मार्चपासून दंडात्मक कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 09:41 PM2019-09-04T21:41:08+5:302019-09-04T21:42:26+5:30

एकाच खाद्यतेलात वारंवार तळलेले पदार्थ खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वारंवार तेलाचा वापर करणारे हॉटेल्स व रेस्टारंट चालक आाणि हातगाडीवर खाद्यान्न विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असून माहितीसाठी वर्कशॉप घेण्यात येईल.

Risk of life due to reusing of edible oils: Punitive action started from March 1 | खाद्यतेलाच्या पुनर्वापरामुळे जीवाला धोका : १ मार्चपासून दंडात्मक कारवाई सुरू

खाद्यतेलाच्या पुनर्वापरामुळे जीवाला धोका : १ मार्चपासून दंडात्मक कारवाई सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देखाद्यतेलाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड अज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच खाद्यतेलात वारंवार तळलेले पदार्थ खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वारंवार एकाच तेलाचा उपयोग करून रोगांना आयतेच आमंत्रण देण्यापेक्षा तळणासाठी वापरलेले तेल इतर कामांसाठी उपयोगात आणावे, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. अशा तेलामुळे पोटाचे आणि किडनीचे विकारही बळावतात. कॅन्सरचाही धोका बळावतो, असा निष्कर्ष नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आला आहे.
तेल हा रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. घरात तळण करताना, खास करून दिवाळीच्या किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये तळणाच्या अनेक फेऱ्या केल्या जातात आणि उरलेले तेल संपेपर्यंत भाजीमध्ये किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते. पुन्हा पुन्हा कडवून उपयोगात आणलेले तेल काळे, घट्ट असे जेलीप्रमाणे झालेले असते. या तेलाचा उपयोग खाण्यासाठी न करता अन्य ठिकाणी करावा.
मोठ्या हॉटेलातील वापरलेले खाद्यतेल लहान हॉटेलात
मोठे उद्योग किंवा हॉटेल्समध्ये उपयोगात आणलेले तेल लहान हॉटेल्समध्ये किंवा स्वयंरोजगार म्हणून खाद्यपदार्थ विकणारे उपयोगात आणतात. याचा सामान्य माणसांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. केंद्र सरकारने १ मार्च २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. हॉटेल वा रेस्टॉरंटमध्ये यापुढे खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. दिवसाला ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाच्या वापर करणाऱ्या हॉटेलला तेलाच्या वापराचे रेकॉर्ड ठेवावे लागतील. खाद्यतेलाची खरेदी, त्याचा किती प्रमाणात वापर केला, वापरलेले तेल पुन्हा तळण्यासाठी घेतले आहे का, यासंदर्भातील माहिती ठेवावी लागणार आहे. तेलाचा पुनर्वापर वारंवार झाल्यास पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कम्पाऊंडचे प्रमाण वाढते. तेलात हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको, असा हा नवीन नियम आहे.
काय होणार कारवाई?
भेसळयुक्त किंवा वारंवार तेल वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. कायद्यात विनापरवाना तसेच मोठे परवानाधारक खाद्यपदार्थ निर्माते आणि उत्पादकांना २ लाख रुपये दंड होणार आहे. ज्यांची नोंदणी आहे व १२ लाख रुपयांच्या आत वार्षिक उलाढाल आहे, त्यांना १ लाख रुपये दंड होणार आहे. आरोग्यास धोका झाल्याचे निष्पन्न झाले किंवा कुणाच्या जीवितास हानी पोहोचली तर तुरुंगातही जावे लागेल. हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडीवाले यांच्यासह सर्वांवर आता अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
हॉटेल व खानावळीत खाद्यतेलाचा सर्रास पुनर्वापर
हॉटेल किंवा खानावळींत खाद्यतेलाचा पुनर्वापर करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शिल्लक जुन्या तेलातच नवीन तेल ओतून त्याचा वापर करून खाद्यपदार्थ तळले जातात. भजी, वडे, समोसे, पुऱ्या तसेच अनेक पदार्थ अशा तेलात तळून विकल्या जातात. अशा तेलात तळलेले खाद्यपदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवितात. तसेच वारंवार वापरणाऱ्या तेलामुळे हृदयाला आणि मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होतो.
खाद्य तेलाचा वारंवार वापर केल्यास कारवाई
नागपुरात लहानमोठे एक हजारापेक्षा जास्त हॉटेल्स आहे. खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत सरकारने १ मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत. दररोज ५० लिटर तेलाचा उपयोग करणारे सर्व हॉटेल्स व रेस्टारंटला तेलाच्या नोंदी ठेवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. वारंवार तेलाचा वापर करणारे हॉटेल्स व रेस्टारंट चालक आाणि हातगाडीवर खाद्यान्न विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असून माहितीसाठी वर्कशॉप घेण्यात येईल.
शशिकांत केकरे, सहआयुक्त (अन्न)
अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: Risk of life due to reusing of edible oils: Punitive action started from March 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.