पॉझिटिव्हिटी दर ५ टक्केवर गेला तर पुन्हा निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 08:53 PM2021-06-09T20:53:04+5:302021-06-09T20:56:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा उच्चांक गाठला होता. मार्च आणि एप्रिल महिने नागपूरकरांसाठी अत्यंत वाईट ...

Restrictions if positivity rate goes up to 5% | पॉझिटिव्हिटी दर ५ टक्केवर गेला तर पुन्हा निर्बंध

पॉझिटिव्हिटी दर ५ टक्केवर गेला तर पुन्हा निर्बंध

Next
ठळक मुद्देनियमांचे पालन करण्याचे आवाहन : पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा उच्चांक गाठला होता. मार्च आणि एप्रिल महिने नागपूरकरांसाठी अत्यंत वाईट ठरले. २९ मार्च रोजी नागपूरचा पॉझिटिव्हिटीचा दर तब्बल ४५.२ टक्क्यांवर गेला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत पॉझिटिव्हिटी दराने नीचांक गाठला असून सध्या हा ५ टक्के पेक्षा कमी आहे. महाराष्ट्र शासनाने हा दर ग्राह्य धरून निर्बंध शिथिल केले आहे. परंतु, पॉझिटिव्हिटीचा दर ५ टक्केच्या पुढे गेला तर पुन्हा निर्बंध लागतील, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. निर्बंध टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे कोरोना चाचणी कमी न करता मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने संक्रमणावर नियंत्रण मिळविले आहे. शहर आणि जिल्ह्यात दररोज ८ हजारांहून अधिक चाचणी होत आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी कोरोनाची चाचणी केली, तर हा दर कमी ठेवण्यात मदत होईल.

आय.सी.एम.आर.च्या आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये बाधितांची सर्वाधिक संख्या होती. नागपूर शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर ४ एप्रिल रोजी ४२.५ टक्के, ६ एप्रिल रोजी ४१.१७ टक्के व ११ एप्रिल रोजी ४२.४४ टक्के नोंदविला गेला होता. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणीची संख्या वाढविली. शासकीय, मनपा आणि खाजगी रुग्णालयात बाधितांना दाखल होण्यासाठी बेड्सची संख्या वाढविण्यात आली. लोकसंख्येनुसार सर्वाधिक ऑक्सिजन बेड, आय.सी.यू. बेड आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करण्यात आले. यामुळे ४५.२ टक्क्यांपर्यंत गेलेला पॉझिटिव्हिटी दराचा आलेख अत्यंत खाली आला. जून महिन्यात पॉझिटिव्हिटी दर सातत्याने खाली येत आहे. १ जूनला २.७ टक्के, २ जूनला २.२६ टक्के, ३ जूनला २.२८ टक्के अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी दर नोंदविला गेला. मागील काही दिवसांत हा दर ५ टक्केच्या खाली आहे.

त्रिसूत्रीचा अंमल करा

निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अजूनही नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर आणि मास्क ही त्रिसूत्री पाळणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. याचा विचार करता नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

२० लाख लोकांची कोरोना चाचणी

मनपातर्फे पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी नागपुरातील २४ लाख लोकसंख्येपैकी २० लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. कोरोना चाचणी केंद्राव्यतिरिक्त मोबाइल व्हॅनच्या माध्यमाने बाजारपेठेत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात आली. पोलिसांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकात तर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची चाचणी करण्यात आली. ज्यांनी लस घेतली आहे किंवा जे आधी कोरोनाबाधित झाले आहे, त्यांना वगळून बाकी लोकांनी चाचणी करणे आवश्यक असल्याचे जोशी यांनी सांगितले.

पॉझिटिव्हिटी दर

४ एप्रिल - ४२.५ टक्के

६ एप्रिल - ४१.१७ टक्के

११ एप्रिल -४२.४४ टक्के

१ जून-२.७ टक्के

२ जून - २.२६ टक्के

३ जून २.२८ टक्के

Web Title: Restrictions if positivity rate goes up to 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.