Reflections on doctors' attacks, doctors-patient dysfunctional relationships: Shivkumar Utture | डॉक्टरांवरील हल्ले, डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब : शिवकुमार उत्तुरे
‘डॉक्टर्स डे’निमित्त सन्मानित सत्कारमुर्तींसोबत डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. अशोक अढाव, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मंजुषा गिरी आणि अन्य मान्यवर .

ठळक मुद्देआयएमएतर्फे ‘डॉक्टर्स डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेद्वारे सोमवारी ‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘डॉक्टरांवरील वाढते हल्ले’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याच कार्यक्रमात वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव होते. मंचावर आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या. संचालन डॉ. अनिरुद्ध देवके व डॉ. अर्चना देशपांडे यांनी केले.
कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध नाहीत
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा असा समज आहे की, सर्व कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध आहेत, मात्र वस्तुस्थिती अशी नाही. त्यामुळे जर डॉक्टरांनी चुकीचे काही केले नसेल तर तक्रारीस घाबरण्याचे काहीएक कारण नाही, असेही सांगत डॉ. उत्तुरे यांनी डॉक्टर व रुग्णांकडून कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ता यांना सन्मानित करण्यात आले. यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अरुण आमले, डॉ. नूतन देव, डॉ. जीवन वेदी, डॉ. अमित समर्थ, डॉ. काजल मित्रा, डॉ. दिवाकर भोयर, नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पत्रकार आनंद कस्तुरे व सामाजिक कार्यकर्ता मधुभाऊ बारापत्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाºया आयएमए सदस्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.
संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी व्हावीत-डॉ. कोल्हे
एखाद्या संस्थेत उमेदीची २० ते २५ वर्षे दिल्यानंतर नाईलाजस्तव त्यास संस्था सोडावी लागते. हे मी इंटर्नशीपदरम्यान ३७ संस्थांच्या अभ्यासावरून सांगतो. त्यामुळे संस्था मोठी झाली तरी ती व्यक्ती मात्र संपून जाते. संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी होणे आवश्यक असते. म्हणूनच कुठलीही संस्था स्थापित न करता स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला, असे मत पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.
‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने डॉ. प्रकाश देव व डॉ. संजय देशपांडे यांनी डॉ. कोल्हेंची मुलाखत घेतली. यावेळी ते मनमोकळेपणाने बोलत होते.
डॉ. स्मिता कोल्हेंचे सेवाकार्यात हातभार, या प्रश्नावर डॉ. कोल्हे म्हणाले की, स्मिताने वकिलीचा अभ्यास केला आहे, शिवाय ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिने रोजगार, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण हे सगळे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. केवळ तिच्यामुळे आम्ही त्या भागातील प्रश्न सोडवू शकलो. स्मिता नसती तर मी केवळ वैद्यकीय सेवाच दिली असती, असे सांगत त्यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्यातील योगदान स्पष्ट केले. सेवाकार्यात समाजाचे नेहमीच पाठबळ मिळते, असेही सांगितले.


Web Title: Reflections on doctors' attacks, doctors-patient dysfunctional relationships: Shivkumar Utture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.