रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प विदर्भाच्या फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:56+5:302021-06-22T04:07:56+5:30

उदय अंधारे नागपूर : विदर्भात रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. उद्योग व अर्थ ...

Refinery and Petro-Chemical Complex Project for the benefit of Vidarbha | रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प विदर्भाच्या फायद्याचा

रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प विदर्भाच्या फायद्याचा

googlenewsNext

उदय अंधारे

नागपूर : विदर्भात रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. उद्योग व अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लोकमतशी बोलताना या मागणीचे समर्थन केले. तसेच, सदर प्रकल्पामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल व रोजगार निर्माण होईल, असे सांगितले.

विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिल्यानंतर, विदर्भातील प्रभावी राजकीय नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती व माजी आमदार आशिष देशमुख यांनीही सदर मागणी उचलून धरली आहे. नागपूर किंवा विदर्भात हा प्रकल्प उभारणे सोयीचे आहे. येथे प्रकल्प झाल्यास ६०० किलोमीटर परिसरातील केंद्रांना तेल व इतर रिफायनरी उत्पादने पुरविली जाऊ शकतील. हा पुरवठा बिलासपूर व हरदापर्यंत वाढवला जाऊ शकेल. तसेच, विदर्भात वर्धा व वैनगंगासह इतरही अनेक नद्या असल्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. पानिपत रिफायनरीला १४०० किलोमीटर लांब असलेल्या गुजरातमधून क्रूड ऑईल पुरविले जात आहे. तेव्हा नागपूर येथे मुंबईवरून क्रूड ऑईल का आणले जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचा पाठिंबा

विदर्भात रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याच्या मागणीला एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचा पाठिंबा आहे. असोसिएशनने यासंदर्भात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन सादर केले आहे. रिफायनरीमुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल.

--- चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशन.

------------

विदर्भात औद्योगिक विकास आवश्यक

विदर्भातील विकसित रस्ते, मेट्रो रेल्वे, मिहान यासह अन्य पायाभूत सुविधांचा उपयोग होण्यासाठी औद्योगिक विकास होणे आवश्यक आहे. रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्समुळे या सुविधांचा योग्य उपयोग केला जाईल. त्यासोबतच या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावेल. सध्या रोजगार कमी असल्यामुळे विदर्भातील नागरिक इतर राज्यात व विदेशात स्थलांतरण करीत आहेत. रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्समुळे त्याला प्रतिबंध बसेल.

----- विनायक देशपांडे, अर्थतज्ज्ञ

---------------

विदर्भाची प्रगती होईल

रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्समुळे विदर्भाची प्रगती होईल. परंतु, हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक ठरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. रिफायनरीमुळे पाणी व माती प्रदूषित होते. परिणामी, पर्यावरण परिणामांचे विश्लेषण करावे लागेल. तसेच, प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यताही तपासावी लागेल.

----- मिलिंद कानडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.

----------

रोजगार निर्मिती होईल

रिफायनरी व पेट्रो-केमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होईल. परंतु, हा प्रकल्प केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तसेच, खासगीकरण झाल्यास कंपनी राष्ट्रीय दर्जाची असेल. त्यामुळे स्थानिक युवकांना या प्रकल्पामध्ये रोजगार मिळणे अशक्य होईल. प्रकल्पाकरिता राष्ट्रीयस्तरावर भरती प्रक्रिया राबविली जाईल. तसेच, प्रदूषणाचा विचार करता हा प्रकल्प विदर्भात उभारणे किती सोयीचे होईल, हे तपासावे लागेल.

----- डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ.

Web Title: Refinery and Petro-Chemical Complex Project for the benefit of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.