मेयो रुग्णालयातील वास्तव; चार वर्षांत २० कोटी ९९ लाख यंत्रांची खरेदीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:25 AM2021-06-07T09:25:38+5:302021-06-07T09:26:11+5:30

Nagpur news शासकीय रुग्णालयांना यंत्र खरेदी करून देण्याची जबाबदारी असलेल्या हाफकिन महामंडळाकडे जमा केला; परंतु हाफकिनकडून अद्यापपर्यंत २० कोटी ९९ लाख ९२ हजार १०९ रुपयांचे यंत्रच खरेदी झाले नाही. धक्कादायक म्हणजे, २०१७-१८ वर्षापासूनचा निधी अखर्चित आहे.

The reality of Mayo Hospital; 20 crore 99 lakh devices have not been purchased in four years | मेयो रुग्णालयातील वास्तव; चार वर्षांत २० कोटी ९९ लाख यंत्रांची खरेदीच नाही

मेयो रुग्णालयातील वास्तव; चार वर्षांत २० कोटी ९९ लाख यंत्रांची खरेदीच नाही

Next
ठळक मुद्दे हाफकिन कंपनीकडून यंत्र खरेदीला कधी येणार वेग

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) मागील चार वर्षांत राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी एकूण ५१ कोटी ७६ लाख ८५ हजार ८९३ रुपयांचा निधी मिळाला. हा निधी शासकीय रुग्णालयांना यंत्र खरेदी करून देण्याची जबाबदारी असलेल्या हाफकिन महामंडळाकडे जमा केला; परंतु हाफकिनकडून अद्यापपर्यंत २० कोटी ९९ लाख ९२ हजार १०९ रुपयांचे यंत्रच खरेदी झाले नाही. धक्कादायक म्हणजे, २०१७-१८ वर्षापासूनचा निधी अखर्चित आहे.

शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु वर्षानुवर्षे हा निधीच खर्च होत नाही; परंतु याला कोणीच गंभीरतेने घेत नसल्याने यामुळे याचा फटका रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला बसत आहे. मेयोला २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी २ कोटी ६० लाख ३३ हजार २०० रुपयांचा निधी मिळाला. हा निधी हाफकिनकडे जमा केला; परंतु यातील १ कोटी १२ लाख ८२ हजार २१४ खर्च झाले असून १ कोटी ४७ लाख ५० हजार ९८६ रुपयांच्या यंत्रांची खरेदीच झाली नाही. यात अस्थिव्यंगोपचार विभागाला लागणारे मोबाइल ‘डिजिटल रेडिओग्राफी सिस्टिम’पासून ते ‘एबीजी’ मशीन, ‘ब्लड बँक’ वाहन व इतरही उपकरणांचा समावेश आहे.

-श्री साईबाबा संस्थानकडून मिळालेला ९ कोटींचा निधी अखर्चित

मेयोला २०१८-१९ या वित्तीय वर्षात श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीकडून ३५ कोटी २५ लाख ६५ हजार ८९२ रुपयांचा निधी उपलब्ध झाला. याच निधीतून १२ वर्षांपासून असलेली एमआरआय व सीटी स्कॅनची प्रतीक्षा संपली; परंतु अद्यापही हाफकिनकडे ९ कोटी ३७ लाख ९९ हजार ९२६ रुपयांचा निधी पडून आहे. यातून बालरोग विभागाला हवे असलेले ‘नियोनेटल व्हेंटिलेटर’,‘अ‍ॅडव्हान्स वायपॅप मशीन’, रुग्णालय प्रशासनाला हवे असलेले ‘हॉस्पिटल लॉण्ड्री’ व आयसीयूसाठी गरजेचे असलेले ‘अ‍ॅडल्ट मेकॅनिकल व्हेंटिलेटर’ आदी यंत्रांची खरेदी रखडलेली आहे.

-जिल्हा वार्षिक योजनेचाही मोठा निधी पडून

२०१८-१९ या वित्तीय वर्षात मेयोला जिल्हा वार्षिक योजनेमधून ३ कोटी ५० लाख ९५ हजार ६४५ रुपयांचा निधी प्राप्त झाला; परंतु १ कोटी २३ लाख १६ हजार ४८५ निधीची यंत्र सामग्री प्राप्त झालेली नाही. २०१९-२० वर्षात याच योजनेतून मिळालेल्या ४ कोटी ३३ लाख ८९ हजार ६६३ निधी प्राप्त झाला असताना यातील ३ कोटी ७० लाख ८६ हजार ४४३ रुपयांचे यंत्र मिळाले नाही. याच वर्षात जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून मिळालेल्या निधीतून २ कोटी १४ लाख ०२ हजार ८०० रुपयांच्या निधीतून तूर्तास तरी एकही यंत्र खरेदी झाले नाही.

योजना : प्राप्त निधी : अखर्चित निधी (२०१७-१८ ते २०१९-२० पर्यंत)

राज्य योजना : ३९१९८६९३ : ३०६३५४६९

जिल्हा वार्षिक योजना : १०४५१८५०८: ६४१५३९१४

श्री साईबाबा संस्थान : ३५२५६५८९२ :९३७९९९२६

जिल्हा खनिज प्रतिष्ठान : २१४०२८००: २१४०२८००:

Web Title: The reality of Mayo Hospital; 20 crore 99 lakh devices have not been purchased in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.