नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:07 AM2019-08-23T11:07:39+5:302019-08-23T11:08:33+5:30

नागपूर शहरातील सर्व सिग्नलवर महापालिका ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी दिली.

'Rain water harvesting' system will be applied to all signals in Nagpur city | नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम

नागपूर शहरात सर्व सिग्नलवर लागणार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टम

googlenewsNext
ठळक मुद्देआग्याराम देवी चौकातील सिग्नलवर पहिला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्यात झालेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’मध्ये विजयी ठरलेल्या ‘सिग्नल आयलँड’या संकल्पनेचा उपयोग करून शहरातील सर्व सिग्नलवर महापालिका ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी दिली. या पथदर्शी प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.
ट्रू ग्रीन एनर्जी यांच्या माध्यमातून शहरातील सर्व सिग्नल, महामार्ग व अन्य ठिकाणी हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिला टप्पा म्हणून सिग्नल आयलँडच्या पायलट प्रकल्पाचे आग्याराम देवी चौकातील सिग्नलवर महापौरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सभापती लता काडगाये, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ट्रू ग्रीन एनर्जीचे अमित सरकार, मंगेश मेढेकर, गजानन आखरे, राजू गुहे, दिगंबर आमदरे, अश्वजीत गाणार, हेमंत वाघ आदी उपस्थित होते.
भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील शासकीय, निमशासकीय व खासगी मोठ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक आहे. त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती नंदा जिचकार यांनी दिली.

‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’मधील संकल्पना
पावसाच्या पाण्याचे संकलन करून ते जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिकेच्या मुख्यालयातही करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, महामार्ग आदी ठिकाणी पावसाचे पाणी थांबविण्याची अथवा ते जमिनीत मुरविण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. शहरातील महत्त्वाच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवसंकल्पना मेयर इनोव्हेशन अवॉर्डमध्ये मांडण्यात आल्या होत्या. त्यातूनच ही संकल्पना पुढे आल्याची माहिती जिचकार यांनी दिली.

Web Title: 'Rain water harvesting' system will be applied to all signals in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.