नागपुरातील बीअर बारमध्ये छापा : विदेशी पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 08:38 PM2019-09-16T20:38:55+5:302019-09-16T20:39:45+5:30

बीअर बारमध्ये पिस्तूलची खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडासह पाचपावली पोलिसांनी चौघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि बुलेटसह तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या.

Raid on Beer bar in Nagpur: foreign pistol seized | नागपुरातील बीअर बारमध्ये छापा : विदेशी पिस्तूल जप्त

नागपुरातील बीअर बारमध्ये छापा : विदेशी पिस्तूल जप्त

Next
ठळक मुद्देचार गुन्हेगारांना अटक : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बीअर बारमध्ये पिस्तूलची खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडासह पाचपावली पोलिसांनी चौघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि बुलेटसह तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या. हे पिस्तूल घेऊन आलेला चंद्रपूरचा एक आरोपी मात्र पळून गेला. पाचपावलीतील दयानंद पार्कजवळ पोलिसांनी रविवारी रात्री ही नाट्यमय कारवाई केली. नितेश रमेश राऊत (वय ३५, रा. पाचपावली), सचिन बाबूराव मेश्राम (वय ३६, रा. धम्मानंदनगर, यशोधरानगर), कोमल देवीदास राऊत (वय ४०, रा. वैशालीनगर) आणि टिनू ऊर्फ अनिकेत रवी धानोरकर (वय २४, रा. वैशालीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार बाल्या ऊर्फ प्रणव सिद्दल (रा. चंद्रपूर) फरार झाला आहे.
सागर बीअरबारमध्ये काही गुन्हेगार पिस्तुलाची खरेदी विक्री करणार असल्याची माहिती पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यावरून रात्री ९.४५ वाजता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सागर बीअर बारमध्ये छापा घातला. तेथे संशयास्पद अवस्थेत बसलेल्या नितेश राऊत, सचिन मेश्राम, कोमल राऊत, टिनू धानोरकर यांना पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींची झडती घेतली असता त्याच्याकडे एक माऊझर (पिस्तूल) पोलिसांना मिळाले. त्यावर मेड ईन यूएसए असे लिहिले आहे. या कारवाईमुळे बारमध्ये एकच धावपळ निर्माण झाली. अनेकांनी बाहेर पळ काढला. त्यात नजर चुकवून पिस्तूल घेऊन आलेला चंद्रपूरचा बाल्या सिद्दल पळून गेला. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुलासोबतच एक बुलेट, हंक आणि व्हिक्टर अशा तीन दुचाक्यांसह एकूण २ लाख, ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, पोलीस निरीक्षक ढवाण, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे आणि सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
कुणाचा होता गेम
पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सचिन राऊत हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पाचवेळा गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. तो ही पिस्तूल विकत घेऊन काय करणार होता, त्याने आणि साथीदाराने कुणाच्या गेमची तयारी केली होती काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याची उत्तरे मिळवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी या सर्वांना न्यायालयात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला.

Web Title: Raid on Beer bar in Nagpur: foreign pistol seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.