Quarter to six lacs cash stolen case disclosed : Accused turned Former employee of credit society | पावणेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्याचा छडा : आरोपी पतसंस्थेचा माजी कर्मचारी
पावणेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्याचा छडा : आरोपी पतसंस्थेचा माजी कर्मचारी

ठळक मुद्देबेलतरोडी पोलिसांनी केली अटक, रोख आणि दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी पतसंस्थेच्या अभिकर्त्याकडून पावणेसहा लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले. विशाल रमेश बोबडे (वय ३२) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून रोख आणि दुचाकीसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
खापरी येथे चक्रधरस्वामी महिला बिगरशेती पतपुरवठा नामक पतसंस्था आहे. प्रेमराज नानाजी बोबडे (वय ५८) यांची पत्नी पतसंस्थेची अध्यक्ष असून प्रेमराज बोबडे बचत अभिकर्ता (एजंट) आहे. ते वर्धा मार्गावरील चिंचभवन दत्त मंदिराजवळ राहतात. २० सप्टेंबरला सकाळी ११. ३० च्या सुमारास दोन - तीन दिवसांची रक्कम एकत्र करून ती बँकेत जमा करण्यापूर्वी बोबडे दैनिक बचत करणाऱ्या खातेधारकांकडून रक्कम गोळा करू लागले. त्यांच्याकडे असलेली ५ लाख, ८३ हजार, ३५४ रुपयांची रोकड त्यांनी लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवून ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीच्या बाजूला अडकवली. त्यानंतर वैशाली मेडिकल स्टोर्समध्ये ते रक्कम गोळा करण्यासाठी गेले. तेथून खातेधारकाची रक्कम घेतल्यानंतर १० मिनिटात ते परत आले तेव्हा त्यांना दुचाकीला अडकवून असलेली ५ लाख, ८३ हजार, ३५४ रुपये असलेली पिशवी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे या चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या धाडसी चोरीचा तपास करताना आजूबाजूला खबरे पेरले. पतसंस्थेच्या व्यवहाराची माहिती असलेल्या आजी-माजी कर्मचाऱ्यांवरही नजर रोखली. पतसंस्थेचा माजी कर्मचारी विशाल बोबडे सध्या कोणतेही काम न करता पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी बोबडेच्या बँक खात्याचे विवरण तपासले असता त्यांना घटनेपुर्वी आणि घटनेनंतर आर्थिक व्यवहारात बरीच तफावत आढळली. घटनेच्या काही वेळेनंतर आरोपी विशालच्या बँक खात्यात २ लाख, १६ हजार रुपये क्रिष्णा रेस्टॉरंटचा मालक आकाश चौरसिया याच्या खात्यातून ट्रान्सफर झाल्याचेही दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात घटनेच्या दिवशी आरोपी विशाल आणि आकाश चौरसियामध्ये वारंवार बोलणे झाल्याचे आढळल्याने पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आकाश चौरसियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही रक्कम विशालच्या खात्यात कशी काय जमा केली,
कुठून आणली, त्याबाबत विचारणा केली. जेव्हा विशाल या पतसंस्थेसाठी रक्कम गोळा (डेली कलेक्शन) करायचा तेव्हा त्याच्याकडे आपण २ लाख, २१ हजार रुपये जमा केले होते. ते त्याने संस्थेत जमा न करता परस्पर हडपले. त्यामुळे आपण त्याच्या मागे तगादा लावला. घटनेच्या दिवशी विशालने फोन करून मिहानमधील टीसीएस कंपनीजवळ बोलवले. त्याने ४ लाख, ३७ हजार रुपये आपल्याला दिले. तुझे २ लाख, २१ हजार घे आणि उर्वरित रक्कम आपल्या खात्यात जमा कर, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे त्याच्या खात्यात ही रक्कम जमा केल्याचे चौरसियाने पोलिसांना सांगितले. विशालकडे आणखी मोठी रक्कम होती, असेही सांगितले त्यामुळे पोलिसांनी आरोपी विशालला १० डिसेंबरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ३ लाख, १३ हजार रुपये तसेच एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ४ लाख, ५०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उधळपट्टीमुळे झाला कर्जबाजारी
आरोपी विशाल हा पतसंस्थेच्या अध्यक्षांचा (फिर्यादीचाही)पुतण्या आहे. त्यांनी त्याला ७ हजार रुपये महिन्याने पतसंस्थेत नोकरी देऊन डेली कलेक्शनची जबाबदारी सोपविली होती. विशालला अनेक व्यसन आहे आणि उधळपट्टीचीही त्याला सवय आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या खातेधारकांसाठी रक्कम गोळा करून तो खात्यात जमा न करता स्वत:च वापरायचा. त्याची ही बनवेगिरी उघड झाल्यानंतर त्याला पतसंस्थेतून काढून टाकण्यात आले. ज्यांची रक्कम त्याने परस्पर वापरली होती, त्यांनीही त्याच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे त्याने चोरीचा कट रचला. काकांची पद्धत त्याला माहीत होती. त्यामुळे सहजच तो ही रक्कम चोरू शकला. मात्र, तीन महिन्यांनी का होईना पोलिसांनी त्याला अटक करून या धाडसी चोरीचा पर्दाफाश केला. परिमंडळ चारच्या उपायुक्त निर्मलादेवी, सहायक आयुक्त विजयकुमार मराठे, बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय एन. तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दिलीप एन. साळुखे यांच्या नेतृत्वात हवलदार अविनाश ठाकरे, तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, नायक रितेश ढगे, प्रशांत सोनुलकर, गोपाल देशमुख, विजय श्रीवास, कमलेश गणेर, राजेंद्र नागपुरे, नितीन बावणे, कुणाल लांडगे आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Quarter to six lacs cash stolen case disclosed : Accused turned Former employee of credit society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.