Pradhanmantri Awas Yojana: 1866 houses sanctioned in 6 talukas of Nagpur district | प्रधानमंत्री आवास योजना :नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर
प्रधानमंत्री आवास योजना :नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर

ठळक मुद्देलाभार्थ्यांना तीन टप्प्यात मिळणार अडीच लाखांचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी. म्हणजे सुमारे ३३० चौ. फुट या आकाराचे असतील व लाभार्थ्यांना स्वत: च ही घरे बांधावयाची आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात एकूण २ लाख ५० हजार एवढे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एनएमआरडीए क्षेत्रात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावित घरकुलांच्या जागेचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामा तयार करावयाचे काम प्रगतिपथावर आहे. मंजूर १८६६ घरकुलांपैकी पैकी सुमारे ४०० घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना घटक चार अंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या घराचे बांधकाम स्वत: करावयाचे आहे. यासाठी बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ५२ नुसार संभंधित ग्रामपंचायतीस आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांने ग्रामपंचायत हद्दीतील (गावठाण ) जागेवर घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांनी रीतसर संंबंंधित ग्रामपंचायतीची परवानगी प्राप्त करून घ्यावी. याबाबत एनएमआरडीएने जिल्हा परिषद व सर्व संबंधित गट विकास अधिकारी यांना तशी विनंती केली आहे.

 


Web Title: Pradhanmantri Awas Yojana: 1866 houses sanctioned in 6 talukas of Nagpur district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.