नागपुरात पोक्सोच्या गुन्ह्याला ठाणेदाराने केले बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 10:07 PM2019-09-19T22:07:51+5:302019-09-19T22:09:25+5:30

लकडगंज ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याआरोपीला वाचविण्याचे प्रयत्न केल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे.

Police Inspector did not take cognizance of POCSO in Nagpur | नागपुरात पोक्सोच्या गुन्ह्याला ठाणेदाराने केले बेदखल

नागपुरात पोक्सोच्या गुन्ह्याला ठाणेदाराने केले बेदखल

Next
ठळक मुद्देसंतापजनक वास्तव उघड, डीसीपींकडून गंभीर दखल : एसीपींच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याआरोपीला वाचविण्याचे प्रयत्न केल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे. या खळबळजनक प्रकरणाची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात कोणत्या कारणामुळे संबंधित अधिकाऱ्याने एवढी मोठी ‘रिस्क’ पत्करली त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त करीत आहेत. त्यामुळे हे संतापजनक प्रकरण संबंधित अधिकाऱ्याच्या अंगलट येण्याचे संकेत मिळाले आहेत.
गंभीर प्रकरणातील बड्या घरच्या आरोपींना वाचविण्याचे अनेक प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून लकडगंज ठाण्यात चर्चेला आहेत. अर्थपूर्ण व्यवहार करून गंभीर गुन्हे बेदखल ठरवले जात असल्याचीही चर्चा आहे. हे प्रकरण तशातीलच आहे. लकडगंजमधील एका गरीब घरच्या मुलीला (वय १५) एका युवकाने प्रेमजाळ्यात ओढले. त्याने तिच्यासोबत नको ते वर्तन केले. हा प्रकार माहिती पडल्यामुळे मुलीच्या आईने आरोपी युवकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाद घातल्याने प्रकरण चिघळले. मुलीच्या आईने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षिकेने (डब्ल्यू पीएसआय) प्रकरणाची तक्रार घेतली. ती ठाणेदाराच्या कानावर गेली. तेवढ्यात आरोपीकडील मंडळींनी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर प्रकरणाला उलटे वळण मिळाले. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील साहेबांनी संबंधित पीएसआयला या प्रकरणाची तक्रार ‘अदखलपात्र’ (एनसी) करण्याचे सुचविले. महिला पीएसआय हादरली. पोक्सो कायद्यानुसार, तातडीने किमान विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मत त्यांनी मांडले. मात्र, वरिष्ठांनी मला येथे कशाला बसविले, असा प्रश्न करून न्यायपूर्ण भूमिका घेणाºया पीएसआयचे मत खोडून प्रकरणात एनसी दाखल करण्याचा आग्रही आदेश दिला. त्यानंतर हे प्रकरण ठाणेदारांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्याच्या मदतीने एनसी केले.
दरम्यान, पीडित मुलगी आणि तिच्या आईवर अन्याय होत असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या एकाने या प्रकरणाची माहिती सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) वालचंद्र मुंढे यांना सांगितली.
एसीपी मुंढे यांनी हे प्रकरण पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या लक्षात आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत उपायुक्त माकणीकर यांनी लगेच एसीपी मुंढे यांना चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत ‘मामांकडून तक्रार अर्ज लिहून घेत’ या गंभीर प्रकरणाला एनसीचे वळण देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला’ हे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातून वरिष्ठांच्या चौकशीत या प्रकरणाला लकडगंज ठाण्यातून एनसी करण्याचा जो प्रयत्न झाला तो चुकीचा अन् गैरकायदेशीर होता, हे स्पष्ट झाले आहे.
पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना छेद !
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला-मुलींवर अत्याचाराचे गुन्हे होऊ नये म्हणून अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. शाळा महाविद्यालयात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण केले जात आहे. पोलिसांकडून मुलींना स्वत:च्या संरक्षणाचे धडे दिले जात आहेत. गुन्हा घडल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्याचेही आवाहन केले जात आहे. महिला मुलींसंबंधी गुन्ह्यात तातडीने गुन्हे दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, लकडगंज ठाणेदाराने या प्रकरणात घेतलेली भूमिका पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना छेद देणारी आहे.
चौकशीतून सर्व उघड करू : डीसीपी माकणीकर
कठुआ आणि उन्नावमध्ये बालिकांवर झालेल्या अत्याचारामुळे देशभर तीव्र संतापाची लाट उसळली. त्यानंतर सरकारने पोक्सो कायदा अधिक कठोर करून बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद केली. विशेष म्हणजे, लकडगंजमधील हे प्रकरण केवळ विनयभंगापुरते नाही. त्यात उघड न करण्यासारखी दुसरीही एक बाजू आहे. या संबंधाने पोलीस उपायुक्त माकणीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी एसीपी मुंढे करीत आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे ‘अशी भूमिका ’ घेतली गेली, हे चौकशीतून उघड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Police Inspector did not take cognizance of POCSO in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.