'कोरोना'शी लढ्यासाठी एका दिवसाचे वेतन द्या : कुलगुरूंचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:38 PM2020-04-02T20:38:00+5:302020-04-02T20:40:02+5:30

‘कोरोना’शी लढ्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग, संलग्नित महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांनी किमान एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे.

Pay a Day to Fight 'Corona': The Vice-Chancellor's Call | 'कोरोना'शी लढ्यासाठी एका दिवसाचे वेतन द्या : कुलगुरूंचे आवाहन

'कोरोना'शी लढ्यासाठी एका दिवसाचे वेतन द्या : कुलगुरूंचे आवाहन

Next
ठळक मुद्देविद्यापीठाच्या तिजोरीतून मदत कधी होणार?

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : संपूर्ण देश सध्या ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करत आहे. ‘कोरोना’शी लढ्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग, संलग्नित महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांनी किमान एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे. दरम्यान, विद्यापीठाकडे सातशे कोटींहून अधिकची गुंतवणूक आहे. अशा स्थितीत विद्यापीठ केव्हा सामाजिक भाव जपत ‘कोरोना’ संघर्षात आपले योगदान देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘कोरोना’पासून बचावासाठी नागपूर विद्यापीठाने अगोदरच १४ एप्रिलपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे. शिवाय परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वसतिगृहांमधील विद्यार्थीदेखील गावांकडे परतले आहेत. देशात ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ते अडचणीत आले असून त्यांच्या मदतीसाठी विविध संस्था, संघटना धावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे. या भावनेतून सर्वांनी किमान एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावे, या शब्दांत त्यांनी आवाहन केले आहे. विद्यापीठातील जे शिक्षक व कर्मचारी स्वेच्छेने वेतन देऊ इच्छित नाहीत त्यांनी वित्त व लेखा अधिकाऱ्यांंना ७ एप्रिलपर्यंत कळवावे, असे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले आहे. जे असे कळविणार नाहीत, त्यांची संमती गृहीत धरून एक दिवसाचे वेतन कापण्यात येईल. तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनीदेखील अहवाल सादर करावा, असे विद्यापीठाच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ कधी घेणार पुढाकार?
विद्यापीठाच्या तिजोरीमध्ये शेकडो कोटींची रक्कम आहे. ३१ मार्च २०१९ रोजी विद्यापीठाच्या गुंतवणुकीचा आकडाच ७३० कोटींहून अधिक होता. तर एकूण ‘सरप्लस’ची रक्कम ही ८४१ कोटींहून अधिक होती. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावावर असलेल्या विद्यापीठाने सामाजिक भाव जपला पाहिजे. कर्मचारी, शिक्षकांचे वेतन कपात होईल तेव्हा होईलच, मात्र स्वत:हून पुढाकार घेत ‘सरप्लस’मधील काही रक्कम सामाजिक भावनेतून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला दिली पाहिजे, असे मत विद्यापीठ प्राधिकरणातील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

Web Title: Pay a Day to Fight 'Corona': The Vice-Chancellor's Call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.