पासवान यांचा दीक्षाभूमीतून एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:58 PM2020-10-08T22:58:20+5:302020-10-08T23:00:28+5:30

Ramvilas Paswan, DikshaBhoomi बिहारमधील महाबोधी महाविहार मुक्तीचे आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही ते कायम आहे. दहा वर्षांपूर्वी रामविलास पासवान यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेत महाबोधी महाविहार मुक्तीचा दीक्षाभूमीवर एल्गार केला होता.

Paswan's Elgar from DikshaBhoomi | पासवान यांचा दीक्षाभूमीतून एल्गार

पासवान यांचा दीक्षाभूमीतून एल्गार

Next
ठळक मुद्देमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन : नागपूरशी होते ऋणानुबंध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारमधील महाबोधी महाविहार मुक्तीचे आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही ते कायम आहे. दहा वर्षांपूर्वी रामविलास पासवान यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेत महाबोधी महाविहार मुक्तीचा दीक्षाभूमीवर एल्गार केला होता.
शीख, ख्रिश्चन, हिंदू, पारसी यांच्या प्रत्येकांच्या धर्मस्थळांवर त्यांचे स्वत:चे व्यवस्थापन आहे. परंतु बिहारमधील बौद्धांच्या महाबोधी विहारात मात्र हिंदूंचे व्यवस्थापन आहे. हे घटनाविरोधी आहे. महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आपण सर्वांना आंदोलनाची लढाई लढावी लागेल. त्यासाठी तयार राहा, असे आवाहन करीत लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांनी बिहार येथील बुद्धगयेतील महाबोधी महाविहार मुक्तीचा एल्गार केला होता.
तथागत गौतम बुद्ध यांच्या ५,५५४ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय धम्मसेना, भिक्खू महासंघ व महाबोधी भिक्खू महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा संघर्ष टप्पा २७ मे २०१० रोजी रामविलास पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमीवरून सुरु करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. तर दीक्षाभूमी स्मारक समितीचे तत्कालीन कार्यवाह दिवंगत सदानंद फुलझेले, अशोक शामकुंवर, सूर्यमणी भिवगडे, रवी शेंडे, भय्याजी खैरकर, देवीदास घोडेस्वार, माया चौरे, विलास गजघाटे, कैलास वारके प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूरशी त्यांचे ऋणानुबंध राहिले आहेत. १९७७ पासून त्यांचा नागपूरशी संबंध आला. त्यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेली दलित सेना एकेकाळी नागपुरात चांगलीच सक्रिय होती. दलित अत्याचाराच्या अनेक आंदोलनात पासवान हे स्वत: सहभागी व्हायचे. ७० च्या दशकात पासवान बिहारचे आमदार म्हणून नागपुरातील दलित आंदोलनाशी जुळले. १९७७ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यावर हा ऋणानुबंध आणखी वाढत गेला. पासवान यांच्या उपस्थितीत पटवर्धन मैदानात दलित पँथरची मोठी रॅलीही झाली होती.

डॉ. आंबेडकर अध्यासन सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका
पासवान यांचे सहकारी मदन कुत्तरमारे यांच्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात रामविलास पासवान यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

वंचितांच्या उत्थानात पासवान यांचे मौलिक योगदान
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज अचानक निधन झाल्याचे ऐकून मला धक्का बसला. अत्यंत दु:खद घटना असून गरीब आणि वंचित समाजासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. वंचित व पीडितांच्या उत्थानात त्यांचे मौलिक योगदान होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनामुळे भारतीय राष्ट्रीय राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे.
नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

Web Title: Paswan's Elgar from DikshaBhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.